विवेक तोटेवार, वणी: बुधवारी वणीतील सेवानगर परिसरात राहणाऱ्या एका इसमाने तर मंगळवार लालगुडा येथील एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. सलग दोन दिवसात दोन आत्महत्येच्या घटना घडल्याने शहर हादरले आहे. या दोन्ही वेगवेगळ्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.
शहरातील सेवानगर भागात राहणाऱ्या प्रकाश तुळशीराम परचाके (38) रा. सेवानगर यांनी बुधावरी दिनांक 29 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता आपल्या घरी आड्याला दोर बांधून आत्महत्या केली. प्रकाश हा मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. प्रकाशने आत्महत्या का केली याबाबत अजूनही काही समजू शकले नाही.
परिचारिकेची गळफास लावून आत्महत्या
मंगळवार सायंकाळी 6 वाहताच्या सुमारास लालगुडा येथील रहिवाशी असलेल्या काजल श्रीराम पथाडे (23) हिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. काजल ही वणीतील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होती. एक महिन्यापूर्वी तिची प्रसूती झाली होती. त्यामुळे ती सुट्टीवर होती. परिणामी काजलचा पगार थांबला असल्याची माहिती मिळत आहे.
मंगळवारी सायंकाळी 6 वाहजताच्या सुमारास काजलने घराच्या फाट्याला गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या घराशेजारील एका व्यक्तीने याबाबतची तक्रार वणी पोलिसात दाखल केली. तक्रारीवरून वणी पोलिसांनी मर्ग नोंद केला आहे.
आर्थिक अडचणीतून आत्महत्या?
काजलच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नसले तरी आर्थिक अडचणीतून तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. काजलची आई रंजनाबाई हिला तीन अपत्य यापैकी दोन मुली व एक मुलगा आहे. एका मुलीचे लग्न झाले असून ती सासरी राहते. तर भाऊ आई व काजल हे लालगुडा येथे राहतात. वडील हयात नसल्याने काजल नोकरी करून कुटुंबाचा गाडा हाकत होती. तिच्या अचानक गेल्याने कुटुंबावर तर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेचा तपास जमादार विठ्ठल बुरेवार करीत आहे.