विवेक तोटेवार, वणी: शहरातील सिंधी कॉलनी परिसरात 2 मे शुक्रवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास टाकलेल्या धाडीत पाच जणांना जुगार खेळतांना अटक केली आहे. या जुगारात प्रतिष्ठीत लोकांचा सहभाग आहे. त्यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
संध्याकाळी साडेसातच्या सुमारास उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक यांना पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या सिंधी कॉलोनीतील एका घरात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी लगेच डीबी टीमला सोबत घेतले. त्यांनी शहरातील बसस्थानक समोरील सिंधी कॉलनी मधील एका घरात रात्री 8 वाजता धाड टाकली. या ठिकाणी पाच व्यक्ती जुगार खेळत असताना त्यांना आढळले. या सर्व व्यक्ती प्रतिष्ठीत आहे.
पोलिसांनी या ठिकाणाहून रोहित सुभाष तारुना (24), राहुल गोपी आहुजा (31), सुमित सुदामा साधवानी (27), प्रवीण चंद्रकांत फेरवानी (40) व घरमालक सुरज चावला (40) यांना अटक केली. त्यांच्याकडून 3110 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींवर भादंवि कलम 4, 5, 269 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकीय दबावाचा वापर !
या प्रकरणा नगरपालिकेतील एका स्विकृत नगरसेवकाच्या मुलाचा सहभाग आहे. त्यामुळे हे प्रकरण दाबण्यासाठी राजकीय नेत्याकडून ब-याच फोनाफोनी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. मात्र अखेर कोणत्याही राजकीय दबावाला न जुमानता या धनदांडग्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आाला आहे. गुन्हा दाखल झाला असला तरी या जुगारात अगदी शुल्लक रक्कम सापडल्याने शहरात विविध चर्चा रंगत आहे.