अखेर वरो-याजवळ सुकनेगावातून निघालेले मजुर ताब्यात
नदीनाले पार करत, लपून छपून 62 मजुरांची मध्यप्रदेशासाठी पायपीट
निकेश जिलठे. वणी: 10 दिवसांपूर्वी ते मजूर तालु्क्यातील एका गावातून पायीच निघाले… त्यांना मध्यप्रदेशात जायचे होते… 60 पेक्षा अधिक मजुरांना छोट्या मुलाबाळांसह प्रवास सुरू झाला… पोलिसांची नजर चुकवत त्यांची वाट सुरू होती… त्यांना गावाची ओढ लागली होती… मात्र अखेर पोलिसांनी त्यांना गाठलंच… ही करुण कहाणी आहे सुकनेगाव इथे अडकेल्या मजुरांची…
परिसरात शेतीचे काम करण्यासाठी मध्यप्रदेश, छत्तीसगड इत्यादी भागातून मोठ्या संख्येने मजूर येतात. दोन-तीन महिने काम केले की ते परत आपल्या गावी जातात. सुकनेगाव येथेही दर वर्षी मध्यप्रदेशातून कुटुंबियांसह मजूर येतात. लॉकडाऊन होण्याच्या एक महिना आधी दिंडोरी जिल्ह्यातील कोयलीदासी इथून 60-65 मजूर त्यांच्या कुटुंबासह आले होते. या काळात ते परिसरातील शेतात हरबरा कापणे, हळद काढणे, पराठ्या उपटणे, खात फेकणे, काड्या तोडणे, धुरे साफ करणे इत्यादी कामं करतात. शेतमालकांतर्फे शेतातच त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली जाते. तिथे झोपडी बांधून ते राहतात.
24 मार्च रोजी अचानक लॉकडाऊन सुरू झाले. काही दिवसांतच त्यांचे काम संपले. त्यानंतर मात्र त्यांना घराची ओढ लागली. घरून वयस्कर व्यक्तींची लवकर परत येण्यासाठी रडारड सुरू झाली. याशिवाय गावाकडे त्यांची थोडीबहुत शेतीही आहे. त्यामुळे त्यांनी 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन संपल्यावर घरी परत येण्याचा निरोप दिला. दरम्यान पुन्हा 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला. मग मात्र त्यांच्या संयमाचा बांध फुटला. त्यांना घरी परतायचे वेध लागले.
त्यांचे काही साथी नागपूर जिल्ह्यात काम करायचे. त्यांनी पायी गेल्यास गावात पोहोचता येईल असे सांगितले. ते पायीच निघाले. त्यामुळे सुकणेगावात अडकलेल्या मजुरांनीही मुलाबाळासह पायीच निघण्याचा निर्णय घेतला. अखेर 22 तारखेला संध्याकाळी त्यांनी गावाची वाट धरली. रस्त्यात पोलीस पकडतात याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी पोलिसांचा ससेमिरा चुकवत, शेतातून, काट्याकुट्यातून, नदी नाले पार करत तर कधी रस्तावरून पायीच त्यांचा प्रवास सुरु झाला.
अशी क्रॉस केली जिल्ह्याची बॉर्डर…
रात्री उशीरा ते चंद्रपूर यवतमाळ-चंद्रपूर बॉर्डरवर पोहोचले. मात्र तिथे पोलिसांचा पहारा असल्याने त्यांना जाण्यास अडचण येत होती. अखेर चार वाजताच्या सुमारास त्यांना गस्तीवरच्या पोलिसांचा डोळा लागल्याचे कळले. याचाच फायदा घेऊन त्या सर्वांनी बॉर्डर क्रॉस केली. पुढे त्यांनी लपतछपत वरोरा क्रॉस केले. दरम्यान परिसरातील काही मजूर जात असल्याची माहिती गस्तीवरच्या पोलिसांना मिळाली. संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान खांबाड्याजवळ वरोरा पोलिसांनी या मजुरांना ताब्यात घेतले.
मदत करून मजुरांची रवानगी
वरोरा पोलिसांनी या मजुरांची समजूत काढली. त्यांना आहे त्या ठिकाणी थांबण्याचा सल्ला दिला. अन्नधान्याची किट देऊन त्यांना परत जाण्यासाठी एका टेम्पोची व्यवस्था केली. अखेर मजुरांना निराश होऊन त्यांना सुकनेगावला परत यावे लागले. तर त्यांचे नागपूर जिल्ह्यातून निघालेल्या त्यांचे साथी महाराष्ट्रातून तर सहिसलामत बाहेर पडले. मात्र मध्यप्रदेशात पोहोचल्यावर मात्र त्यांना तिथल्या पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना कॉरेन्टाईन केल्याची माहिती त्यांना दिली.
मजुरांना घरी जाण्याची प्रतीक्षा
नुकतच केंद्र सरकारने अडकलेल्या मजुरांना परत जाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सध्या गावागावातून ग्रामपंचायतीद्वारा अडकलेल्या मजुरांची यादी करणे सुरू आहे. त्यावरून सुकनेगाव ग्रामपंचायतीने या 60-62 भागात मजुरांची माहिती प्रशासनाला दिेली. त्यावरून त्या मजुरांची ओळख पटवण्यासाठी त्यांना दिंडोरी जिल्ह्यातील जिल्हाधिका-यांनी फोन करून चौकशी केली. या मजुरांना घरी आणण्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क सुरू असून लवकरच त्यांची परत जाण्याची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती आहे.
सध्या पोलिसांनी त्यांना अऩ्यधान्याची कीट दिल्याने त्यांना खान्यापिण्याची अडचण नाही. मात्र सध्या काम नसल्याने मजूर घरी जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासनानी त्यांची लवकरात लवकर परत पाठवण्याची व्यवस्था करावी अशी मागणी मजूर करीत आहे. याशिवाय सुकणेगावातील रहिवाशी योग्य प्रकारे काळजी घेत असल्याची माहिती ही त्यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली.
(फोटो आणि व्हिडीओ साभार – अनिल खामनकर, सुकणेगाव)
लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ….