धक्कादायक… तपासणी न करताच मजुरांना मेडिकल सर्टिफिकेट
रुग्णालयातच सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा. मजुरांची एकच झुंबड
जब्बार चीनी, वणी: मजुरांना नाव नोंदणीसोबतच डॉक्टरांच्या प्रमाणपत्राचीदेखील गरज आहे. त्यामुळे घराची ओढ लागलेल्या या मजुरांनी मंगळवारी वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी केली. ही परिस्थिती सांभाळण्यासाठी आरोग्य प्रशासनाने कोणतीही ठोस व्यवस्था केली नसल्याने इथे सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडताना दिसला. त्यातच धक्कादायक बाब म्हणजे मजुरांची कोणतीह तपासणी न करताच त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जर तपासणीच करायची नव्हती तर मजुरांवर उन्हातान्हात उभे राहण्याची वेळ का आणली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मजुरांना परत जाण्याच्या नोंदणीसह वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. परिणामी परिसरात असणा-या मजुरांनी सोमवारी शहरातील ग्रामीण रूग्णालयात आरोग्य तपासणीसाठी सकाळपासूनच रांगा लावल्या. ही रांग पहीले ओपीडीत नोंदणी करण्यासाठी तर नंतर ट्रामासेंटरच्या इमारतीत तपासणीसाठी लागत आहे. सोमवारी तर सकाळी 10 वाजेपर्यंतच तपासणी करण्यात आली. त्यानंतर उरलेले विद्यार्थी तसेच परप्रांतीयांना उद्या या, म्हणून परत पाठविण्यात आले. यामुळे सोमवारी अनेकांची निराशा झाली.
आज मंगळवारी पुन्हा मजुरांनी वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी ग्रामीण रुग्णालयाची वाट धरली. मात्र ग्रामीण रुग्णालयात याविषय अत्यंत ढिसाळ नियोजन आढळून आले. सोशल डिस्टन्सिंग राखले जावे याची कोणतीही खबरदारी रुग्णालय प्रशासनाद्वारे घेतली गेली नव्हती. त्यामुळे तिथे लोकांची एकच गर्दी झाली. मजुरांना प्रमाणपत्रासाठी तासंतास उन्हातान्हात ताटकळत उभे राहावे लागले. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे त्यांची कोणतीही तपासणी न करताच वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याची माहिती मजुरांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली. यात जर एखाद्यामध्ये कोरोनाचे लक्षणं आढळल्यास परिस्थिती वेगळे रूप धारण करायला वेळ लागणार नाही.
ग्रामीण रूग्णालयात यासंबंधी दर्शनी भागात ठळक अक्षरात कोरोनाबाबतच्या सुचनांचे साधे माहितीचे फलक सुद्धा नाही. पावती फाडल्यावर आरोग्य प्रमाणपत्रासाठी कुठे जायचे याबाबतही तिथे ठळक माहिती लिहिलेली नाही. रोजची जनरल ओपीडी व आरोग्य प्रमाणपत्रासाठीची तपासणी वेगवेगळी असणे गरजेचे होते. मात्र ती वेळ एकच ठेवल्याने एकाच वेळी लोकांची झुंबड उडत आहे.
ग्रामीण रुग्णालयात कर्मचा-यांच्याही सोयी-सुविधांची वानवा
सध्या कोरोनाच्या विळख्यात यवतमाळ जिल्हाही आला आहे. वणीत अद्याप एकही रुग्ण आढळले नसले तरी इथे रुग्णांची तपासणी करण्या-या डॉक्टरांकडे व परिचारकांकडे पीपीई कीट सुद्धा नाहीत. इतकंच काय तर सध्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी साधी पाच हजारांची टेम्परेचर स्किनिंग मशिनदेखील उपलब्ध नाही. डॉक्टरांनी कोरोनाच्या काळात तपासणीसाठी आवश्यक असलेल्या साहित्याची मागणी केली आहे. मात्र ते साहित्य ही अद्याप त्यांना दिले गेले नसल्याची माहिती आहे. यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाची लागण झाल्याची संख्येने 90 चा आकडा गाठला असून हा आकडा कधी शंभरी गाठेल याची हे सांगणे कठिण नाही. मात्र तरी देखील वणीतील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना तर दुरच कर्मचा-यांनाही योग्य ते साधनं उपलब्ध नाहीत. त्यामुळे आरोग्यावर खर्च होणारा पैसा जातो कुठे? असा प्रश्न उपस्थित होणे सहाजिक आहे.
काय आहे नोंदणीची पद्धत
राज्य शासनामार्फत नोंदणीसाठी एक संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या संकेतस्थळावर परिपूर्ण माहितीसह छायाचित्र व इतर आवश्यक कागदपत्रांची प्रत अपलोड करून नोंदणी करणे गरजेचे आहे. या आवश्यक कागदपत्रात वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे. नोंदणी केल्यावर अर्जदारास ऑनलाईन टोकन क्रमांक प्राप्त होणार आहे. हा ऑनलाईन टोकन क्रमांक टाकून पास डाऊनलोड करावा लागतो.
लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ….