आजही अर्ध्याअधिक मजुरांना तपासणीविनाच प्रमाणपत्र
हजारो मजुरांच्या तपासणीसाठी केवळ एकच स्क्रिनिंग मशिन
जब्बार चीनी, वणी: ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभाराबाबत ‘वणी बहुगुणी’ने वृत्त प्रकाशीत करताच अखेर लॉकडाऊनच्या तब्बल दीड महिन्यानंतर ग्रामीण रुग्णालयात केवळ एक टेम्परेचर स्क्रिनिंग मशिन आली. मात्र हजारो मजुरांसाठी केवळ एकच मशिन असल्याने अर्ध्याअधिक मजुरांना तपासणीविनाच वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचा आयसोलेशन कक्षाला अद्यापही टाळा असल्याने अनेक बाहेरगावाहून वणीत आलेले अनेक मजुरांचा वणीत मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे हा आयसोलेशन कक्ष सध्या शोभेची वास्तू बनली आहे.
मजुरांचा जीव आजही मेतकुटीला..
वणी शहर परिसरात अडकून असलेल्या परप्रांतियांना त्यांच्या गावी जायचे आहे. त्यांना जाण्यासाठी आरोग्य प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यासाठी परप्रांतीयांनी ग्रामीण रूग्णालयाकडे धाव घेतली असता, त्यांना शेतकरी मंदीरातील कॅम्पमध्ये पाठवले जाते. त्यामुळे या परप्रांतियांनी शेतकरी मंदीराकडे आपला कडे मोर्चा वळविला.
शेतकरी मंदिरात वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी आधी एक रांग होती, दोन तासातच या एका रांगेच्या चार रांगा कराव्या लागल्या. मशीन एकच असल्याने एका रांगेतील नागरीकांची तपासणी व्यवस्थित झाली परंतु इतर रांगेतील मजुरांना तपासणीविनाच प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
आयसोलेशन कक्षच ‘कॉरेन्टाईन’
दुस-या राज्यातून किंवा जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक मजुराला गावस्तरावरील विलगीकरण कक्षात ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. वणी येथे ग्रामीण रूग्णालयातील विलगीकरण कक्ष बनला तेव्हापासुन रिकामाच आहे. शनिवारपासून मजुरांचे लोंढे आपापल्या गावाकडे परतणे सुरु झाले आहे. बाहेरून आलेल्या मजुरांना १४ दिवस क्वॉरंटाईन ठेवण्याचे निर्देश आहेत. मात्र वणीतील 10 बेडच्या विलगीकरण कक्षाचा दरवाजा ही अद्याप उघडण्यात आला नाही.
परिणामी बाहेर गावाहून आलेला मजूर सध्या वणीत इतरत्र फिरताना दिसतोय. वणीतील एका परिसरात तर सुमारे 150-200 मजूर राहत असल्याची माहिती आहे. ही बाब फार धोकादायक आहे. त्या मजुरांना विलगीकरण कक्षात व्यवस्था केली जाऊ शकते. मात्र त्याला टाळा लागल्याने विलगिकरण कक्ष फक्त नावापुरताच उरल्याचे दिसत आहे. याशिवाय विलगीकरण कक्षासाठी वेगळा स्टाफ, पाण्याची व्यवस्था तसेच मनोरंजनाच्या साधनांची व्यवस्थाही करणे गरजे आहे. मात्र या कक्षात अद्याप कोणतीही व्यवस्था केली गेली नसल्याची माहिती आहे.
ग्रामीण रुग्णालयाला भोंगळ कारभाराची लागण
ग्रामीण रुग्णालयात येणा-या रुग्णांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. केसपेपरवर लिहून दिलेली औषधे ही रुग्णालयातील न देता बाहेरील मेडिकल मधून आणावयास सांगितले जाते. त्यामुळे गरीब रुग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारच्या उपाययोजनांचे फलक तसेच ओपीडी ट्रामा केअर मध्ये सुरू असल्याचा फलक रुग्णालयाच्या आवारात दिसत नाही.