भुकेल्या मजुरांची कळवळ… मध्यरात्री मदतीसाठी धावपळ

अखेर रात्री 2 वाजता मजुरांना मिळाले जेवण

0

निकेश जिलठे, वणी: मुकुटबनहून निघालेले सुमारे 80-90 मजूर रात्री उपाशीपोटी वणीतील मुकुटबन रोडवर अडकलेले होते. कुणाची तरी मदत मिळेल या आशेपोटी जागे असलेले मजूर जेवायला काही मिळते का यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र काहीही न मिळाल्याने त्यांच्यावर उपाशीपोटी झोपण्याची वेळ आली. मात्र रात्री ही बाब वणीतील काही संवेदनशील व्यक्तींना कळली.  त्यांनी मध्यरात्री धावपळ करून बिस्किट, फळे व पाणी याची व्यवस्था केली. तर एकाने मजुरांना वरण भाताची व्यवस्था केली. अखेर रात्री 2 वाजता या मजुरांच्या पोटात दोन घास गेले आणि त्यांच्या चेह-यावर हास्य फुलले. या कार्यासाठी वणीच्या पोलीस विभागाने विशेष पुढाकार घेतला.

गेल्या दोन दिवसांपासून मुकुटबन येथील सिमेन्ट फॅक्टरीत काम करणारे मजूर पायीच घरी झारखंडला परतत आहेत. संध्याकाळी उन्ह कमी झाल्यावर सुमारे 80 ते 90 मजूर मुकुटबनहून झारखंडसाठी निघाले. रात्री 8.30 वाजताच्या सुमारास ते वणीतील मुकुटबन रोडवर पोहोचले. तिथे त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला. हे मजूर उपाशीपोटी निघाले होते. वणीत मजुरांच्या जेवणाची व्यवस्था केली गेली अशी माहिती त्यांना मिळाली. त्यासाठी त्यांनी काहींना मदतीसाठी संपर्क साधला. पण उशीर झाल्याने त्यांच्या जेवणाची व्यवस्था काही झाली नाही.

मजूर उपाशी पोटी जागे होते. ते जमेल तिथे कॉल करून मदतीची याचना करीत होते. रात्री 11.30 च्या दरम्यान अडेगाव येथील मंगेश पाचभाई यांनी ‘वणी बहुगुणी’ला संपर्क साधून काही मजूर मुकुटबन रोडवर उपाशीपोटी असून त्यांच्यासाठी किमान बिस्किटांची व्यवस्था होऊ शकते का याबाबत विचारणा केली. ‘वणी बहुगुणी’तर्फे हा मॅसेज रात्री व्हायरल करण्यात आला. ‘वणी बहुगुणी’च्या टीमने काही सेवाभावी व्यक्तींनाही मजुरांच्या जेवणाची काही व्यवस्थेबाबत संपर्क साधला.

अखेर रात्री 12 च्या सुमारास व्हॉट्सऍपवरील मॅसेज वाचून वणी पोलीस स्टेशनचे पीएसआय गोपाळ जाधव यांनी वणी बहुगुणीशी संपर्क साधून या मॅसेजची खात्री केली. त्यांनी शक्य तेवढ्या लवकर मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो असा निरोप दिला. मात्र त्यांच्यापुढेही इतक्या रात्री खाण्याच्या वस्तूंची व्यवस्था कशी करावी हा प्रश्न होता. त्यांनी लगेच त्यांच्या सहका-यांना सोबत घेऊन रात्री 12 च्या दरम्यान एका किराना दुकानदाराला दुकान उघडण्याची विनंती करून बिस्किटांची व्यवस्था केली. रात्री उशिरा मदत मिळाली नाही तर मजुरांवर उपाशी झोपण्याच वेळ येऊ नये म्हणून मंगेश पाचभाई यांनी देखील रातोरात बिस्किटांची व्यवस्था करून अडेगावहून वणीची वाट धरली. पोलीस विभागातील कर्मचारी व परिसरात चित्रकार म्हणून ओळख असलेले शेखर वांढरे यांनी देखील रात्री मदतीसाठी काही सेवाभावी व्यक्तींना निरोप दिला.

डिअर बिर्याणीने तयार केले रात्री जेवण
डिअर बिर्याणीचे संचालक सचिन मराठे यांनी मजुरांच्या मदतीचा मॅसेज वणी बहुगुणी या फेसबुकवर वाचला. त्यांनी लगेच संपर्क साधून जेवणाची व्यवस्था करतो असे सांगितले. रात्री 12 वाजता त्यांनी वरण आणि भात तयार करायला सुरूवात केली.

मुकुटबन रोडवरील कल्पना मार्बल या दुकानाच्या शेजारी 80-90 मजूर खाण्यासाठी काही मिळते का याची वाट बघत होते. रात्री साडेबाराच्या सुमारास पीएसआय गोपाळ जाधव, शेखर वांढरे आणि पोलीस विभागाचे काही कर्मचारी तिथे मदत घेऊन पोहोचले. त्यांनी तिथे बिस्किटांचे वाटप केले. मॅसेज वाचून काही सेवाभावी व्यक्तीही तिथे बिस्किट, पाणी व फळ घेऊन पोहोचले. रात्री 12.45 वाजताच्या सुमारास मजुरांना बिस्किट आणि केळांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर अर्धा तासाने अडेगावहून मंगेश पाचभाई हे त्यांच्या सहका-यांसह बिस्किटचे पुडे घेऊन पोहोचले.

रात्री 2 वाजता मजुरांना जेवण
रात्री दोन वाजताच्या सुमारास डियर बिर्याणीचे संचालक सचिन मराठे हे त्यांच्या घराशेजारील रियाज शेख व संतोष थोरात यांच्यासह जेवण व पाणी घेऊन कारने मुकुटबन रोडवर पोहोचले. अखेर रात्री 2 वाजता वरण भात याचे भरपेट जेवण मजुरांना मिळाले. 20-25 मजूर घोन्सा फाट्यावर असल्याची माहिती त्या मजुरांनी दिली. त्यांनाही लगेच तिथे जाऊन जेवण देण्यात आले.

परतीच्या प्रवासातील वणीकरांची मदत आयुष्यभर लक्षात राहील – जहांगिर, मजूर
वणीत मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. रात्री 8.30 वाजेपासून आम्ही जेवण मिळते का याची वाट बघत होतो. जसजशी रात्र वाढत होती तसतशी जेवण मिळण्याची आशा आम्ही सोडली होती. मात्र रात्री वणी पोलिसांनी बिस्किट व फळ दिल्याने पोटाला आधार मिळाला व रात्री उशिरा का होईना जेवणाची व्यवस्था झाली. पुढे इथे येणे होईल  की नाही याची माहिती नाही. पण वणीकरांनी रातोरात केलेली ही मदत आयुष्यभर लक्षात राहील.

या मजुरांना मदत करण्यासाठी पोलीस विभागाचे पीएसआय गोपाळ जाधव, जिल्हा विशेष शाखेचे शेखर वांढरे, एसडीपीओ पथकाचे सुनिल खंडागळे, इकबाल शेख, आशिष टेकाडे, विजय वानखे़डे, प्रदीप ठाकरे, रवी इसनकर, प्रशांत आडे, यांच्यासह सचिन मराठे, रियाज शेख, संतोष थोरात, मंगेश पाचभाई यांच्यासह वणीतील काही सेवाभावी व्यक्तींनी परिश्रम घेतले. वणीकरांनी रात्री जी मजुरांप्रती संवेदनशीलतेचा प्रत्यय दिला त्याचे कौतुक होत आहे.

लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.