सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिका-यांना धरले धारेवर….
प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे वणीकर झालेत आक्रमक...
विवेक तोटेवार, वणी: कोरोना संदर्भात बाहेरून येणा-यांची योग्य ती तपासणी होत नसल्याच्या मुद्दयावरून झालेल्या बैठकीत शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाच्या चालढकल व बनचुके वृत्तीमुळे कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्याच्या महत्वाच्या बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष वणीकरांना जाणवत होते. यालाच अनुसरून शहरातील सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते व सुजाण नागरीकांनी महसुल भवनात आमदारांच्या मुख्य उपस्थितीत अधिका-यांची बैठक बोलावली होती. बैठकीत वणीकरांनी आक्रमक भूमिका घेतल्याने प्रशासनाचे चांगलेच वाभाडे निघाले. एका मुद्यावर तर एका अधिका-याने मुलाची शपत घेतल्यावरच चर्चा थांबली.
बैठकीत सुरूवातीला लहान सहान गोष्टींचा व्यापारांना होणारा त्रास व अपमानास्पद वागणुक खपवुन न घेण्याचा इशारा राकेश खुराना यांच्या कडून देण्यात आला. राजाभाऊ पाथ्रडकर व रज्जाक पठान यांनी इतर जिल्ह्यातुन व मुख्यत: मुंबई व पुणेवरून येणा-या नागरीकांची कोणतीच तपासणी न करता होम कॉरेन्टाईन करण्याच्या मुद्दयावरून प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली व अनेक सुचना दिल्यात.
बैठकीत निघाला दारूचाही मुद्दा….
महत्त्वाचं म्हणजे इतर मुद्यासह या बैठकीत दारूचा मुद्दा देखील निघाला. वाईनशॉप बाजारपेठेबाहेर कसे असा प्रश्न दिपक कोकास यांनी उपस्थित करत मुख्य बाजारपेठेत दारूच्या दुकानांना संमती दिल्यावरून न. प. मुख्याधिका-यांना सुनावले. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवारांनी सुद्धा तहसीलदार व न.प. मुख्याधिकारीच्या कामगीरीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
या बैठकीला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार श्याम धनमणे, ठाणेदार वैभव जाधव, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक कमलाकर पोहे, नगर पालिकेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीनंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शहरात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता प्रशासनाने दक्षता घेणे गरजेचे असताना प्रशासनातर्फे मात्र योग्य ती खबरदारी घेतली जात नाही. परिणामी वणीकरांचा जीव टांगणीला आहे. असा आरोप या निवेदनातून करण्यत आला आहे.
बैठकीत रवी बेलुरकर, सुभाष तिवारी, अखिल सातोकर, पुमोद निकुरे, मंगल तेलंग, राजु गुंडावार, शहाबुद्दीन अजाणी यांनीही तक्रारी वजा सुचना केल्यात. महत्वाचे म्हणजे या बैठकीचे आयोजन प्रशासनाकडून किंवा आमदारांकडून नाही तर नागरीकांनी अनौपचारिकरित्या स्वयंस्फुर्तीने आयोजन केले होते. यात वणीतील सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, सुजाण नागरिक यांची उपस्थिती होती.
निवेदनात वणीत बाहेरून येणाऱ्या वाहन चालकांची तपासणी होणे आवश्यक आहे. परंतु त्या ठिकाणी आरोग्य कर्मचारी उपस्थित नसल्याने तपासणी न करताच वाहन चालक व वाहणाचा सफाई कर्मचारी वणीत शिरकाव करीत आहे. यांच्यामुळे शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे यांची तपासणी करूनच त्यांना शहरात येऊ दयावे. मुंबई पुण्यासारख्या शहरातून वणीत दाखल होणाऱ्यांना संशयित असल्यास 2 ते 3 दिवस कोरोन्टाईन करून त्यानंतर 14 दिवस होम कोरोन्टाईन करावे. अशा प्रमुख मागण्या यात करण्यात आल्या आहेत.
कोविड केअर सेंटरमध्ये ‘केअरलेस’ व्यवस्थापन
कोरोनाबाधित शहरातून तसेच बाहेर जिल्ह्यातून शहरात दाखल होणा-या लोकांसाठी परसोडा येथे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. मात्र त्या सेंटरचा संपूर्ण डोलारा हा कंत्राटी कामगारांवर आहे. अपुरे कर्मचारी, तपासणी करणा-या कर्मचा-यांना अपु-या सोयीसुविधा दिल्या गेल्या आहेत परिणामी इथे रुग्णाची योग्य ती तपासणी होत नाही. परसोडा फाट्यावर कोविड केअर सेंटरचा साधा दिशाफलकही नसल्याने तपासणीकरीता येणा-या लोकांवर हेलपाटे मारण्याची वेळ येते. त्यामुळे या ठिकाणी दिशाफलक लावावे, यासह प्रत्येक चेकपोस्टवर पोलिसांसह एक आरोग्य कर्मचारीही द्यावा अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
अनेक लोक गा़ड्या बंद असल्याने पायीच येतात व परसोडा येथे तपासणीसाठी दाखल होतात. मात्र तिथे तपासणीसाठी आलेल्या व्यक्तींना साधी बसण्याचीही सोय नाही. त्यामुळे त्यांना उन्हातच तातकळत बसावे लागते. एका रुग्णाला तपासणीसाठी सुमारे 20-30 मिनिटांचा वेळ जातो. त्यामुळे तपासणीसाठी आलेल्या लोकांना तिथे बराच काळ थांबावे लागते. मात्र इथे त्यांच्या बसण्याची कोणतीही व्यवस्था नाही. तिथे तपासणीसाठी थर्मल मिशन देण्यात आली आहे. मात्र सध्या तापमान वाढल्यामुळे ही मशिन योग्य प्रकारे काम करत नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे योग्य ती तपासणी होत नाही. यावरही उपाय काढणे गरजेचे आहे. तसेच जो होम कॉरेन्टाईनचा शिक्का मारला जातो. तो शिक्काही केवळ दोन ते तीन दिवसात जात आहे. त्यामुळे यावर योग्य ती कार्यवाही करावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
ढिसाळ व्यवस्थापनामुळे कर्मचारी जाणार होते संपावर
आरोग्य विभागाच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे तसेच त्यांना योग्य ते सुरक्षा उपकरणे न दिल्याने कंत्राटी कर्मचा-यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोविडसारख्या आपत्तीत तात्काळ असे पाऊल उचलल्याने शहराचे नुकसान होण्याच्या शक्यतेने त्यांनी हे पाऊल उचलायचे टाळले. मात्र यापुढेही अशीच परिस्थिती राहिल्यास कंत्राटी कामगार संपाचे हत्यार उपसू शकण्याची शक्यता असल्याची माहिती ‘वणी बहुगुणी’ला मिळाली आहे.
महसुल विभागाचे दोन महत्वपुर्ण अधिकारी स्वत डॉक्टर असुन वणीच्या आरोग्य विभागाची ही दयनिय स्थिती असणे हे वणीकरांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. अखेर या ढिसाळ कारभाराबाबत वणीकरांचा संयमाचा बांध फुटला व त्यांच्याद्वारे निवेदन देण्यात आले. यावर लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
वणी बहुगुणी आता टेलीग्रामवर आहे. आपलं चॅनेल (@Wani Bahuguni) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि वणी व परिसरातील ताज्या व महत्त्वाच्या बातम्या आणि घडामोडी मिळवा.