विवेक तोटेवार, वणी: वणीपासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या राजूर कॉलरी येथील बुद्धविहारासमोरील दुकानाला आग लागली. या आगीत सहा दुकान जळून भस्मसात झाले. आज दुपारी 3 दरम्यानची ही घटना आहे. डीपीवरील शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे. ही आग इतकी भीषण होती की अवघ्या पाच मिनिटात सहा दुकानं जळाली. या आगीत सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.
राजूर कॉलरी येथील बुद्धविहारसमोर असलेल्या जुन्या आठवडी बाजारात वीज मंडळाच्या डीपी आहे. सकाळ पासून जि प शाळेजवळील विजेच्या खांबेचे काम सुरु होते. दुपारी तीन वाजताच्या दरम्यान काम संपल्यानंतर जसा वीज पुरवठा सुरू झाला तसेच बुद्ध विहाराजवळील डीपीवर स्पार्क झाला आणि आणि ठिणग्या उडून शेजारील दुकानावर पडल्या. ठिणग्यामुळे त्या डीपीलगत असलेल्या दुकानाना लगेच आग लागली. उन्हाळा व प्रचंड उष्णतामानामुळे आगीने लगेच रौद्र रूप धारण केले.
ही आग इतकी भीषण होती की अवघ्या पाच मिनिटात इथले सहा दुकाने भस्मसात झाले. आग लागल्या बरोबर स्थानिक नागरिकांनी पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण हे अवघ्या पाच मिनिटात झाल्याने तोपर्यंत दुकाने जळाली होती. आग लागल्या लागल्या अग्निशमन वाहनही आले. अग्निशमनने पुन्हा पाण्याच्या फवाऱ्याने आग पूर्णपणे विझवली.
स्थानिकांच्या तत्परतेमुळे आग वाढली नाही
आग लागल्याबरोबर गावातील पोलीस पाटील घटनास्थळी हजर होऊन त्यांनी सर्वप्रथम अग्निशमन विभागाला संपर्क केला व स्थानिक जनतेला घेऊन पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात वाढण्यास प्रतिबंध झाला. या दुर्घटनेत सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहेत.
जळालेली दुकानं व नुकसान…
मोह गुलशेख शहा मोहम्मद – कोंबडी दुकान- नुकसान अंदाजे 40 हजार, तौसिफ अहमद – कोंबडी दुकान- नुकसान 70 हजार, शेषराव दाढे- भाजीपाला दुकान – नुकसान 50 हजार, गणेश गोपाल हिकरे- बकरा मटण विक्री – नुकसान 30 हजार, शंकर हिकरे – बकरा मास विक्री – नुकसान 30 हजार, दत्ताजी क्षीरसागर – कपडे इस्त्री दुकान – नुकसान 20 हजार…