ज्योतिबा पोटे, मारेगाव: कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रशासनाने गर्दी होणा-या सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमावर प्रतिबंध लावला आहे किंवा त्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. आधी लग्न आणि अंत्यसंस्कार कार्यासाठी 20 लोकांना सामील होण्याची परवानगी होती, तर लॉकडाऊन 4 मध्ये लग्न आणि अंत्यसंस्कारासाठी 50 लोकांना सामील व्हायची मुभा देण्यात आली. मात्र लग्नात जरी 50 व-हा़डी दिसत असले तरी पंगत मात्र 100 व-हाड्यांची उठत असल्याचे चित्र परिसरात आहे.
भारतीय समाज हा उत्सवप्रिय आहे. समाजात सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रमाला जास्तच महत्व आहे. लग्न हे त्यातीलच एक कार्य. सध्या कोरोनामुळे यावर काही निर्बंध घालण्यात आले आहे. अनेक ठिकाणी प्रशासनाने दिलेल्या गाईडलाईऩ फॉलो केल्या जातात. मात्र अऩेक जागी या गाईडलाईन पायदळी तुळवताना दिसून येत आहे.
अनेकदा लग्न प्रसंगी चित्रिकरण होत असल्याने किंवा त्याची तक्रा होऊ शकत असल्याने यावर कुणी धोका पत्करत नाही. मात्र लग्नानंतर असलेल्या पंगतीत मात्र 100 पेक्षा अधिक व-हाडी दिसून येते. त्यामुळे कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोनाचा प्रभाव व्यवसायिकांवर..
प्रशासनाने दिलेल्या गाईडलाईनमुळे परिसरात भव्य दिव्य असणा-या सोहळ्याला आता कौटुंबीक स्वरूप आले आहे. मोजक्या लोकांमध्ये हा सोहळा होत असल्या यात मोठ्या प्रमाणात पैशाची बचत होत आहे. तर दुसरीकडे विवाह सोहळ्याशी संबंध असलेल्या व्यवसायावर त्याचा प्रतिकुल प्रभाव पडताना दिसत आहे. कापड दुकानादार, फोटोग्राफर, मंगल कार्यालय, कॅटरिंग, मंडप डेकोरेशन, मेहंदी कलाकार, गिप्ट सेन्टर, वरातीसाठी लागणारे वाहने यामुळे अनेकावर उपासमारीची पाळी आली. तर कमी खर्चात विवाह सोहळा पार पड़त असल्याने काही लोक याबाबत समाधानही व्यक्त करित आहे.