कोरोनाच्या धास्तीने बसकडे प्रवाशांनी फिरवली पाठ
पाच दिवसांत वणी आगाराला केवळ 22 हजार रूपये प्राप्त
जब्बार चीनी, वणी: कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी देशभरात लॉकडाऊऩ लागू आहे. शासनाने जिल्हा अंतर्गत बससेवा सुरू करण्याची परवानगी दिली. मात्र त्यास प्रवाशांचा हवा तसा प्रतिसाद नाही. आधी प्रवासी एसटीची वाट पाहताना दिसत होते. मात्र आता एसटीलाच प्रवाशांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रवाशांच्या गर्दीने नेहमी गजबजणाऱ्या बसस्थानकांत सध्या शुकशुकाट दिसून येत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बसस्थानकात नेहमी होणारी प्रवाशांची गर्दी कमी झाली आहे.
केवळ 311 प्रवाशांनी केला प्रवास
22 ते 27 मे अशा पाच दिवसात अवघ्या 311 प्रवाशांनी प्रवास केला. व यातुन महामंउळाला 21 हजार 704 रूपयाचे उत्पन्न मिळाले. मागील वर्षी याच पाच दिवसात महामंडळाला 25 लाखाचे उत्पन्न झाले होते. मागील वर्षीपेक्षा 1 टक्काही उत्पन्न महामंडळाचे नसल्याने महामंडळाच्या तोटयाची कल्पना करू शकतो. तर दुसरीकडे परप्रांतीय मजुरांसाठी 51 बसेसच्या माध्यमातुन महामंडळाला 15 लाखाचे उत्पन्न झाले आहे.
वणी आगाराला 10 फे-यांची परवानगी आहे मात्र सकाळच्या तीन फे-याला थोडे प्रवासी असतात. मग 11 नंतरच्या बसला प्रवासीच मिळत नाही. 22 मेला फक्त यवतमाळ व पांढरकवडा तर 23 मे पासून यवतमाळ व पांढरकवडा व राळेगाव अशा तीनच टायमिंगला सकाळी कमी जास्त प्रमाणात प्रवासी मिळत आहे. एकूणच प्रवासी नसल्याने महामंडळाला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
नॉन रेड झोनमध्ये समावेश झाल्याने 22 मेपासून जिल्ह्यांतर्गत बससेवेला प्रारंभ झाला खरा, परंतु कोरोना विषाणू संसर्गाची धास्ती असल्याने बसमध्ये प्रवास करण्यास प्रवासी धजावत नसल्याचे गत पाच दिवसांतील एकंदर परिस्थितीवरून दिसून येते. वणी आगारात पाच दिवसांत केवळ 311 प्रवाशांनी बसमधून प्रवास केला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य शासनाने 21 मार्चपासून लालपरीचा चक्काजाम केला. त्यामुळे 21 मार्चपासून राज्यभरातील बसगाड्या आहे तिथेच थांबविण्यात आल्या होत्या. यात सर्वच आगाराचे मोठे नुकसान झाले. वणी आगारालाही याचा जवळपास दोन कोटींचा फटका बसला आहे.
दरम्यान यवतमाळ जिल्हा हा नॉन रेड झोनमध्ये असल्याने 22 मे पासून काही अटींवर जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू झाली असून वणी आगाराच्या बसेस प्रवाशांच्या सोयीसाठी बसेस उभ्या आहेत. परंतु कोरोना विषाणू संसर्गाची धास्ती असल्याने बसमधून प्रवास करण्यास प्रवासी धजावत नसल्याचे दिसून येते. परराज्य, परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने मजूर कामगार येत असून जिल्ह्यातील नागरिक यापासून सावध होत बसमधील प्रवास टाळत आहे.