विवेके तोटेवार, वणी: वणीतील मोमिनपुरा येथे बुधवारी मध्यरात्री दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटातील सुमारे 7-8 लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोन्ही गटातील आरोपींवर गु्न्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या थरारक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून यामुळे विविध चर्चेला ऊत आला आहे.
वणीतील रहिवाशी असलेले जमीर खान उर्फ जम्मू तर इजहार शेख यांच्यामध्ये गेल्या काही काळापासून तणाव आहे. गेल्या महिन्यात 21 एप्रिल रोजी इजहार गटाच्या अब्दुल मजीद अब्दुल सत्तार याने जम्मूवर हल्ला केला होता. यात जम्मू याला दुखापत झाली होती. बुधवारच्या मध्यरात्री दिनांक 28 मे रोजी रात्री 12.30 वाजताच्या सुमारास मजीद हा त्याच्या घरी जात होता. मोमिनपु-यातील दर्गा चौकात यावेळी जम्मू गटाचे काही लोक उभे होते. ते मजीदला मारहाण करण्यासाठी त्याच्या मागे धावले. त्याला पकडून त्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाण होताना पाहून मजीदचा भाऊ त्याच्या मदतीला धावला तर त्यालाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीची माहिती त्वरित इजहार शेख याला मिळाली. त्याने लगेच याची माहिती त्याच्या गटातील लोकांना दिली.
इजहारच्या गटातील सुमारे 30-40 लोक हातात लाकडी दांडे, काठ्या घेऊन मोमिनपु-याच्या दिशेने गेले. मोमिनपु-यातील दर्गा चौकात जम्मू गट व इजहार गटाचे लोक समोरासमोर आले. तिथे त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटातील लोकांकडून एकमेकांवर हल्ला करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे जम्मू खान याचा परिसरात दबदबा असल्याने त्याच्या मदतीला मोमिनपु-यातील सर्वसामान्य लोक ही बाहेर पडले. यात महिलांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसाचा ताफा त्वरित दाखल
दरम्यान पोलिसांना या रा़ड्याबाबत कुणीतरी माहिती दिली. माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता डीवायएसपी सुशीलकुमार नायक व ठाणेदार वैभव जाधव आपल्या ताफ्यासह त्वरित घटनास्थळावर हजर झाले. त्यांनी लगेच परिस्थिती आटोक्यात आणत अर्ध्या तासातच सुमारे 15-20 आरोपींना अटक घेतली. तसेच जम्मू खान आणि इजहार शेख यांना सुद्धा अटक कऱण्यात आली आहे.
एकाची परिस्थिती गंभीर
यासंपूर्ण हाणामारीत 7-8 लोकांना जखमी झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले. यातील 4-5 जणांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना त्वरित चंद्रपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. त्यातील एक चून्नू नावाच्या आरोपीची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
या प्रकऱणी दोन्ही गटातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
(गुन्हा दाखल होताच ही बातमी अपडेट करण्यात येईल)
वणी बहुगुणी आता टेलीग्रामवर . आपलं चॅनेल (@Wani Bahuguni) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि वणी व परिसरातील बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडी मिळवा.