उपविभागातील 5 जिनिंग कारखान्याचे परवाने रद्द
सीसीआई सोबत करारनाम्याचे भंग केल्या प्रकरणी कारवाई
जितेंद्र कोठारी, वणी: भारतीय कापूस निगम (CCI) व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ यांच्या सोबत कापूस हंगाम 2019-20 मध्ये कापूस खरेदी बाबत केलेला करारनामा पूर्ण न केल्यामुळे वणी तालुक्यातील 4 व मारेगाव येथील 1 जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीचा पणन परवाना, खाजगी बाजार समिती परवाना व कृषी उत्पन्न बाजार समिती परवाना रद्द करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील उमरखेड, दिग्रस, कळंब, खडका व राळेगाव येथील जिनिंग करखान्यासह वणी येथील इंदिरा कॉटन प्रा.ली., बालाजी फायबर्स प्रा.ली. शिंदोला येथील सचिन फायबर्स लिमी., पुरड येथील साईकृपा कॉटन प्रा.लिमी. व मारेगाव येथील अहफाज कॉटेक्स प्रा.लिमी. चा समावेश आहे. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यवतमाळ यांचे दि . 29.05.2020 रोजीच्या आदेशानुसार वरील सर्व जिनिंग प्रेसिंग कारखान्यांना काळ्या यादीत टाकून त्यांची अग्रीम रक्कम जप्त करण्यात आली आहे. सर्व जिनिंग फॅक्टरीचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरणला देण्यात आले आहे.
परवाना रद्द करण्यात आलेल्या जिनिंग संचालकांनी सीसीआई व पणन महासंघ सोबत केलेल्या करारानुसार सर्व कापूस खरेदी पूर्ण होई पर्यंत आपला जीन सुरू ठेवावयास पाहिजे होता. मात्र सदर जिनिंग युनिट अद्याप सुरूच करण्यात आले नाही, त्यामुले शासकीय कापूस खरेदी खोळंबली आहे. सदरची कारवाई आपत्ती व्यस्थापन कायदा 2005 अनव्ये करण्यात आली असून आदेशाची प्रत संबंधित जिनिंग फॅक्टरी सह सभापती/ सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती वणी, राळेगाव, कळंब, उमरखेड, दिग्रस व व्यवस्थापक, महावीरा अग्रीकॅअर, खाजगी बाजार समिती वणी यांना पाठविण्यात आली आहे.