अखेर “त्या” फरार रेती तस्कराला अंतरिम जामीन मंजूर
आरोपी होता कागदोपत्री फरार, गावात मात्र मुक्त संचार
वणी बहुगुणी डेस्क: महसूल अधिकाऱ्यांना धमकी देऊन बळजबरीने अवैध रेती भरलेला ट्रक खाली करणाऱ्या वणी येथील ‘त्या” रेती तस्कराला पांढरकवडा सत्र न्यायालयातुन अंतरिम (तात्पुरता) जामीन मंजूर झाल्याची माहिती आहे. गणेशपूरचे मंडळ अधिकारी महेंद्र देशपांडे यांच्या तक्रारीवरून आरोपी उमेश पोद्दार रा.वणी यांच्यावर शासकीय कामात अडथळा व जीवे मारण्याची धमकी दिल्यावरून वणी पो.स्टे. मध्ये 21 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आले.
गुन्हा दाखल होऊन 7 दिवस लोटून ही आरोपीला अटक न झाल्यास वणी बहुगुणीने तपास अधिकारी यांना विचारणा केली असता, आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले. मात्र या काळात आरोपी शहरात मुक्त संचार करीत असल्याचे अनेकांनी पाहिले. त्यामुळे आरोपीला अटक न करण्यामागे पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का ? असा प्रश्न उपस्थित झाला होता.
दि. 27 मे रोजी आरोपीने अटकपूर्व जामीनसाठी पांढरकवडा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले. याचीसुद्दा माहिती पोलिसांना होती. मात्र आरोपीला पकडण्यासाठी पोलीस इंटरेस्टेड नसल्यामुळे अखेर आरोपीला अंतरिम जमानत मिळविण्यात यश मिळाले.
न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर जामीन आदेशाची प्रत आरोपी किंवा त्याचे वकिलांनी ज्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे त्या पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक आहे. परंतु जामीन मिळून तीन दिवस झाले असता आरोपीने स्थानिक पोलीस स्टेशनला जामीन आदेशाची प्रत आणून दिली नाही. माहितीनुसार आरोपीला शनिवारी वणी तहसील परिसरात फिरताना काही लोकांनी पाहिले. मात्र हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असून पोलिसांना आरोपी दिसला नाही हे विशेष.