प्रेयसीच्या मृत्यूनंतर प्रियकरानेही कवटाळले मृत्यूला

आठवड्यापूर्वीच प्रेमीयुगलांनी केले होते गावातून पलायन...

0

सुशील ओझा, झरी: त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघांनीही प्रेमाच्या आणाभाका घेतल्या…. कायम सोबत राहण्याचा निश्चय केला…. घरून विरोध होता म्हणून ते पळूनही गेले… मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते…. प्रेसयीला मधूमेहाचे औषध न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला…. तर त्याच्या दुस-या दिवशी प्रियकरानेही आत्महत्या करून आपले जीवन संपवले… ही हृदयद्रावक घटना आहे झरी तालुक्यातील माथार्जून या गावातील…. या अधू-या प्रेम कहाणीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वृत्त असे की…. दिलीप कुमरे (21) हा माथार्जून येथील रहिवाशी आहे. त्याचे एक दोन वर्षांपूर्वी गावातीलच एका कुमारीकेशी प्रेमसंबंध जुळेल. त्यांच्या प्रेमात भेटीगाठी सुरू झाल्या. काही दिवसांनी या दोघांच्या नात्याबाबत गावात कुणकुण सुरू झाली. दबक्या आवाजात दोघांच्या संबंधाबाबत चर्चा होऊ लागली. मात्र म्हणतात ना सत्य आणि प्रेम कितीही लपवलं तरी एक ना एक दिवस समोर येतच. अखेर हे संबंध मुलीच्या कुटुंबीयांना माहिती व्हायला काही वेळ लागला नाही. मुलीच्या घरच्यांनी मुलाला भेटायला मनाई केली.

घरून पळून जाण्याचा निर्णय…
घरच्यांना माहिती झाल्यामुळे दोघांच्या भेटीगाठीवर बंधनं आली. विरहामुळे दोघांचाही जीव कासाविस व्हायचा. अखेर त्या दोघांनी पळून जाण्याचा निर्णय़ घेतला. गेल्या आठवड्यात 23 मे रोजी या प्रेमीयुगलाने गावातून पलायन केले. घटनेच्या दुस-या दिवशी मुलगी अल्पवयीन असल्याने मुलीच्या आईने याबाबत पाटण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. त्यानुसार मुलावर भादंविच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

मुलीला मधूमेहाचा आजार…
मुलीला मधुमेह (शुगर) असल्याची मिळत आहे. तिला रोज दोन वेळा इन्सुलिन घ्यावे लागत होते. मात्र पळून जाताना मुलीने औषधे सोबत नेले नाही. पळून गेल्यावर तिला शुगरचा त्रास होऊ लागला. मात्र त्या काळात तिला औषधी मिळाली नाही. तिला लॉकडाऊनमुळे औषध मिळाले नाही कि ते भीतीमुळे औषधी आणायला बाहेर गेले नाही याची निश्चित माहिती मिळू शकली नाही. दरम्यान मुलीची प्रकुर्ती खालावत गेली. अखेर तिची परिस्थिती गंभीर झाली. दिलीपने त्याच्या आजारी असलेल्या प्रेयसीला हैद्राबाद येथे रुग्णालयात दाखल केले. तिथे तिच्यावर उपचार सुरू होता. मात्र उपचारा दरम्यान तिची प्राणज्योत मालावली.

प्रेयसीच्या अचानक मृत्यूमुळे हादरलेला दिलीपने हताश होऊन गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला. एका ऍम्बुलन्समध्ये तिचे प्रेत टाकून तो माथार्जूनकडे रवाना झाला. 31 मे च्या रात्री 2.30 वाजताच्या सुमारास तो माथार्जून येथील स्वतःच्या घरी पोहोचला. मुलाने अत्यंत खिन्न होऊन तिचे प्रेत ऍम्बुलन्समधून बाहेर काढत घराच्या अंगणात ठेवले. दिलीपने तिच्या प्रेतावर तिची मेडिकल हिस्ट्रीचे कागद ठेवले आणि वडिलांना तुमची सून आणली असे सांगून रडत रडत तिथून पळून गेला.

प्रियकरानेही घेतला जीवन संपवण्याचा निर्णय..
सकाळीच्या सुमारास गावापासून काही अंतरावर पाटनाई ते माथार्जुन मार्गावर पोलीस जात असताना त्यांना तिथे दिलीप गंभीर अवस्थेत पडलेला आढळला. त्याच्या तोंडातून फेस येत असल्याने त्याने विषारी द्रव्य प्राषण केल्याचे त्यांना लक्षात आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता दिलीपला तातडीने दवाखान्यात भरती केले. मात्र काही वेळातच त्याचीही प्राणज्योत मालवली.

प्रातिनिधिक फोटो

दोघांचीही कोरोनाची चाचणी…
पोलिसांनी पुढील कार्यवाही करत या प्रेमी उगलांचे प्रेत पुढील तपासणीसाठी झरी येथे पाठवले. मुलीला मधूमेह होता. मधूमेह असणा-या लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊन जीव जाण्याची शक्यता अधिक असल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांचे कोरोनाचे सॅम्पल घेतले. दोघांचेही सॅम्पल यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तपासणीचे रिपोर्ट येताच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

सदर घटनेचा तपास ठाणेदार अमोल बारापात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे जमादार अभिमान आडे, पिदूरकर, संदीप सोयाम, अंकुश दरबसतेवार, अंकुश पातोडे करीत आहे.

प्रातिनिधिक फोटो

अधूरी एक कहाणी…
ते दोघे ही एक सुखी संसार थाटण्याच्या निश्चय करून पळून तर गेले मात्र त्यांना केवळ आठवडाभराचा सहवास मिळाला. प्रेयसीच्या मृत्यूमुळे प्रियकरही मानसिक दृष्या खचला होता. त्यामुळे त्यानेही तिचे प्रेत त्याच्या वडिलांना सुपूर्द करून तुमची सून घ्या असे सांगून तो खिन्न अवस्थेत निघून गेला. त्या दोघांनी लग्न केले होते की नाही याची माहिती अद्याप मिळालेली नाही. त्यातच मुलीचा मृत्यू कोरोनामुळे तर झाला नाही याची तपासणी केली जात आहे. सुखी संसाराची स्वप्न बघणा-या प्रेमीयुगुलांचा संसार केवळ आठवडाभरापुरता ठरला. दोघांच्याही मृत्यूमुळे परिसरातील लोक हादरले असून त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.