वणी येथील सीसीआयच्या कापूस खरेदीची सीबीआय चौकशी करा
शेतक-यांच्या नावावर व्यापा-यांच्या कापसाची खरेदी होत असल्याचा आरोप
विवेक तोटेवार, वणी: सीसीआयने खरेदी केलेल्या कापसाबाबत गुरुदेव सेनेतर्फे सीबीआय चौकशी करावी अशी मागणी गुरुदेव सेनेतर्फे करण्यात आली आहे. सीसीआयतर्फे जो कापूस करण्यात आला आहे त्यात व्यापा-यांचा शेकडो क्विंटल कापूस असून ज्यांच्या शेतात कापूस पिकतही नाही अशांच्याही ७/१२ वर कापसू विक्री केल्याचा आरोप करत या प्रकऱणाची सीबीआयमार्फत सखोल चौकशी करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आज शुक्रवारी याबाबत उपविभागीय अधिका-यांना निवेदन देण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांना कापूस विकता आला नाही. खरीप हंगामाला सुरूवात होणार असल्याने शेतक-यांनी कवडीमोल भावाने व्यापाऱ्याला विकावा लागला. सीसीआयची खरेदी वणीत सुरू होताच शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीसाठी आणला आहे. मात्र अधिकारी कापूस खरेदीला जाणीव पूर्वक विलंब लावत आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड मानसिक तणावात येत असून शेवटी त्यांना व्यापा-यांना कापूस विकावा लागत आहे.
व्यापाऱ्यांच्या नावाने शेतीचा सातबारा आहे व त्यांच्या शेतात कापूस लागवड देखील नाही अशांच्या नावाने शेकडो क्विंटल कापूस खरेदी विक्रीचा व्यवहार करत आहे. तर शेतकऱ्यांनी मात्र खाजगी व्यापाऱ्यांनाच कापूस विकला पाहिजे असा छुपा अजेंडा वापरत आहे. सीसीआय ही संस्था केंद्राशी निगडित असल्याने या संस्थेच्या सर्व खरेदी विक्रीच्या व्यवहाराची सीबीआय मार्फत चौकशी करावी.
ज्यांच्या नावाने १०० क्विंटल पेक्षा जास्त कापूस खेरदी विक्री केली आहे अशा सर्वच लोकांच्या चुका-यांची चौकशी होई पर्यंत स्थगिती द्यावी, दोषी अधिकारी व व्यापाऱ्यांवर सक्त कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देते वेळी गुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर यांच्यासह पुंडलिककाका मोहितकर, अरुण टेकाम, निखिल झाडे यांच्यासह गुरूदेव सेनेचेकार्यकर्ते उपस्थित होते.