प्रहारच्या विद्यार्थी संघटनेच्या पदाधिका-यांचा राजीनामा
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काम होत नसल्याचाा आरोप
वणी बहुगुणी डेस्क: प्रहारच्या विद्यार्थी संघटनेचे 5 पदाधिकारी व 2 सदस्य अशा सात कार्यकर्त्यांनी एकाच वेळी राजीनामा दिला आहे. पक्षात विद्यार्थ्यांच्या कामाकडे वरिष्ठ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी त्यांचा राजीनामा प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कड व जिल्हा प्रमुख रवी राऊत यांना पाठवला आहे. त्यांचे राजीनामे मंजूर करण्यात येत असल्याची माहिती राजीनामा देणा-या पदाधिका-यांनी वणी बहुगुणीला दिली.
राजीनाने दिले यात तालुका प्रमुख अनिकेत चामाटे, उपतालुका प्रमुख साई नालमवार, उपतालुका प्रमुख अभिराज ब्राह्मणे, तालुका संघटक प्रफुल्ल पंधरे, शहर सह संघटक करण तांबे, तालुका सह संघटक निलेश मोगरे या पदाधिका-यांसह सदस्य गौरव ताटकोंडावार, तेजस भगत यांचा समावेश आहेत.
गेल्या दोन वर्षापासून प्रहार विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर व सामाजिक प्रश्नांविषयी ऍक्टिव्ह होती. मात्र वरिष्ठांनी पदाधिकार्यांकडे दुर्लक्ष केले. विद्यार्थ्यांचे जे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य हवे होते ते वरिष्ठांकडून मिळाले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांची कुचंबना होत होती. जे पदाधिकारी प्रामाणिक कार्य करीत होते त्यांना दुजाभावाची वागणूक दिली गेली, केवळ निवडणुकीपुरता कार्यकर्त्यांचा वापर केला जातो असा आरोप राजीनामा देणा-या पदाधिका-यांनी केला आहे.
बच्चूभाऊंशी संपर्क होऊ दिला जात नाही – अनिकेत चामाटे
बच्चूभाऊंचे कार्य बघून आम्ही प्रहारमध्ये जॉईन झालो. बच्चूभाऊ मंत्री झाल्याने सर्वसामान्यांच्या त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहे. त्यामुळे विद्यार्थी त्यांच्या प्रश्नांवर आमच्याशी संपर्क साधतात. आम्ही त्या समस्या बच्चूभाऊंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला असता आमचा संपर्क होऊ दिला जात नाही. अखेर सततची फरफट होत असल्याने आम्ही राजीनामा देण्याचा निश्चय केला.
– अनिकेत चामाटे, तालुका प्रमुख, प्रहार विद्यार्थी संघटना
गेल्या दोन वर्षांपासून प्रहार विद्यार्थी संघटनेने परिसरात चांगला जम बसवला होता. विद्यार्थ्यांचे प्रश्न असो किंवा सामाजिक कार्य यात प्रहार विद्यार्थी संघटना नेहमी अग्रेसर राहायची. मात्र त्यांच्या अचानक सामुहिक राजीनाम्याने विद्यार्थी चळवळीत चर्चेला उधाण आले आहे. राजीनामा दिलेले कार्यकर्ते दुस-या पक्षात जाणार की आता यावर बच्चू कडू यावर निर्णय़ घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.