जब्बार चीनी, वणी: हजरत ख्वाजा मोहम्मद हयात रहमतुल्ला अलय यांच्या उर्स (पुण्यतिथी) निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मोमिनपुरा येथील दर्ग्यात हा उर्स साजरा केला जाणार आहे. यावर्षी कोरोना माहामारीमुळे अत्यंत साध्या पद्धतीने उर्सचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी संध्याकाळी उर्सला सुरूवात होणार आहे.
पीर (संत) हजरत ख्वाजा मोहम्मद हयात रहमतुल्ला अलय यांचा दरवर्षी 17 जून ते 19 जून या कालावधीत उर्स साजरा केला जातो. या उर्सला 120 वर्षाची परंपर आहे. मात्र यावेळी कोरोनामुळे केवळ आज शुक्रवारी 19 जून रोजी संध्याकाळी साजरा केला जाणार आहे. दर्ग्यावर चादर चढवणे, फतेहाखानी व ध्वज चढवणे इ. विधी होणार आहेत. याशिवाय संध्याकाळी लंगर याचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी धुमधडाक्यात साजरा होतो उर्स
वणीत दरवर्षी धुमधडाक्यात उर्स साजरा केला जातो. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. केवळ वणीतीलच नाही तर इतर जिल्हयातूनही या उर्ससाठी भाविक येथे हजेरी लावतात. उर्स निमित्त कव्वाली, जलसा इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र यावेळी हे सर्व कार्यक्रम रद्द करून कोरोनामुळे अत्यंत साधेपणाने उर्स साजरा करण्याचा निर्णय़ उर्स कमिटीने घेतला आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचे कुठेही उल्लंघण होणार नाही, गर्दी होणार नाही याची संपूर्ण काळजी घेऊन उर्सचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय लंगर निमित्त तयार केलेले जेवणही लोकांना घरपोच दिले जाणार आहे.
उर्ससाठी इस्माईल खान, अनवर हयाती, सैयद जफर, अब्दुल जफर, अब्दुल साजिद, साजिद खान, सैयद सलिम, मोहसिन शेख, सना खान, अमजद खान, रियाज अली यांच्यासह परिसरातील भाविक परिश्रम घेत असून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करूनच उर्स साजरा करावा असे आवाहन उर्स कमिटीतर्फे करण्यात आले आहे.