जब्बार चीनी, वणी: भारत-चीन सीमेवरील गलवान घाटीमध्ये चीनी सैनिकाच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना वणीतील इंदिरा चौकात इजहार शेख मित्र परिवारातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी चीनी सैनिकांनी केलेल्या भ्याड कृत्याचा निषेध ही करण्यात आला.
सोमवारी भारत आणि चीन यांच्या दरम्यान लदाखच्या गलवान सीमेवरील झालेल्या संघर्षामध्ये भारत देशाचे 20 वीर जवान शहीद झाले. 1899 मध्ये सर्वप्रथम गुलाम रसूल गलवान या व्यक्तीने लडाखच्या भुभागांमधील या 1400 फूट खोल अशा घाटीचा व तेथून वाहणा-या नदीचा शोध लावला. तेव्हापासून या घाटीला त्या व्यक्तीचे नाव म्हणून गलवान खोरे म्हटले जाते.
गलवान घाटी व नदी भारतासाठी अतिशय महत्त्वाची आहे. परंतु चीन जबरदस्ती भारतामधील या घाटीचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असून या भागात घुसखोरी करीत आहे. आता हा संघर्ष अती गंभीर परिस्थितीमध्ये आलेला आहे.
या आधी 1962, 1975 व आता 2020 अशा तीन वेळेस भारत आणि चीन मध्ये गलवानवरून आंतरराष्ट्रीय स्तरावर संघर्ष पेटलेला दिसून आलेला आहे. आता चीन मधूनच आलेल्या कोरोणा या महामारी आजाराशी संपूर्ण भारत देश लढा देत असताना, अचानक चिनी घुसखोरांनी सोमवारी गलवान खो-यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु भारताच्या जवानांनी लढा देत त्यांचा हा कट हाणून पाडला. अशी भावना यावेळी व्यक्त कऱण्यात आली.
या वेळी इजहार शेख मित्र परिवाराच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनी घुसखोरांना प्रत्युत्तर द्या अशी मागणी केली. या श्रद्धांजली कार्यक्रमाला देवीदास काळे, ओम ठाकूर, प्रमोद निकुरे, सुभाष तिवारी, आबीद हुसेन, भास्कर गोरे, अभिजित सोनटक्के, अन्वरभाई, सुरेश बन्सोड, आतिफ रहमान, आशिद खान तसेच इजहार शेख मित्रपरिवरातील सदस्य उपस्थित होते.