विवेक तोटेवार, वणी: मास्क न लावता शहरात फिरणाऱ्यांवर तसेच दुचाकीवर डबल आणि ट्रिपल सीट फिरणाऱ्यांवर आज 24 जून रोजी दुपारी कारवाई करण्यात आली. तर 5 वाजतानंतर दुकान चालू ठेवणाऱ्यांना तंबी देऊन सोडण्यात आले. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार यांनी केली. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याने नियम तोडणा-यांच्या खिशाला चांगलीच चोट बसण्याची शक्यता आहे.
वणीत काल दोन रुग्ण सापडले. त्यामुळे जनतेने सतर्क राहावे याकरिता आज पोलीस विभागाद्वारे विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत विना मास्क लावता फिरणाऱ्या 48 जणांवर कारवाई करण्यात आली. तर दुचाकीवर डबल व ट्रिपल सीट फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यातच प्रशासनाच्या नियमानुसार 5 वाजल्यानंतर आपली प्रतिष्ठाने सुरू ठेवणाऱ्या 22 दुकानदारांना तंबी देऊन सोडून देण्यात आले.
अगदी आठवडाभरपूर्वी वणीत कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याने वणीकर बिनधास्त होते. परंतु आता प्रशासन सतर्क झाले असून नियम मोडणा-यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याने नियम मोडणा-यांच्या खिशाला चांगलीच चोट बसू शकते.
नागरिकांनी सतर्क राहावे – वैभव जाधव
सध्या वणीतील परिस्थिती गंभीर आहे. वणीत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर नागरिकांना वारंवार मास्क लावून फिरण्याबाबत व वाहन डबलसीट न चालवण्याबाबत तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. मात्र शहरात कोरोना पेशंट सापडूनही अनेक लोक नियमांचे पालन करत नाही. नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी हाच या कारवाईमागचा उद्देश होता. ही कारवाई येत्या काही दिवस सुरूच राहील.
– वैभव जाधव, ठाणेदार वणी पो.स्टे.
काल विनामास्क व डबलसीट प्रवास करणा-या 12 लोकांवर कारवाई करण्यात आली होती. आजची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्तपणे करण्यात आली.