जब्बार चीनी, वणी: महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारच्या निष्काळजी पणामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज मिळावे यासाठी दि. 23 जूनला भारतीय जनता पार्टी वणी विधानसभेच्या वतीने येथील जिल्हा मध्यवर्ती बँक व स्टेट बँकेसमोर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. ती अजून पर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नाही. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याची घोषणा सुद्धा उद्धव सरकारनी केली होती पण ती अद्यापपर्यंत मिळाली नाही. या सर्व मागण्या पूर्ण करून शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज मिळालेच पाहिजे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही बँकेच्या शाखेसमोर शारीरिक दुरतेचे नियम पाळून थाळीनाद आंदोलन करीत शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ करून कर्ज देण्यासाठी घोषणा देण्यात आल्या.
आंदोलनात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तथा भाजयुमोचे जिल्हा अध्यक्ष तारेन्द्र बोर्डे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पिदूरकर, पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, माजी शहराध्यक्ष रवी बेलूरकर, तालुकाध्यक्ष गजानन विधाते, शहराध्यक्ष तथा न. प. वणीचे उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे यांच्या सह सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.