मृत कोरोना पोजिटिव्हच्या संपर्कातील व्यक्तींच्या नावाची यादी उघड
कुठून झाली यादी लिक? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना पोजिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेले हाई रिस्क लोकांची यादी उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. काल संध्याकाळपासून ही यादी वॉट्सऍपवर फिरत होती. कोरोनामुळे मृत झालेल्या महिलेच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्तींचे यात नावं आहेत. झरी जामनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना जो अहवाल पाठवीला त्या अहवालात या सर्वांची नावं नमुद केलेली होती. मात्र हे पत्रच व्हायरल झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार झरी तालुक्यातील महादापुर येथे प्रसूतीसाठी माहेरी आलेल्या महिलेला प्रसूती कळा झाल्यानंतर प्रथम झरी ग्रामीण रुग्णालय व तिथून यवतमाळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यवतमाळ जिल्हा रुग्णालयात महिलेने एक मृत बाळाला जन्म दिल्यानंतर थोड्या वेळाने श्वास घेण्याचा त्रास होऊन तिचा मृत्य झाला. मृत्यूनंतर महिलेच्या प्रेताची कोविड 19 चाचणी करण्यात आली होती. रिपोर्टमध्ये मृत महिला कोरोना पोजिटिव्ह असल्याचे उघड झाले.
मृत व्यक्ती कोरोना पोजिटिव्ह असल्याची माहिती मिळताच आरोग्य विभागाने सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेले लोकांना ट्रेस करून क्वारन्टीन करण्यास सुरुवात केली. शासकीय नियमानुसार पोजिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या हाई रिस्क लोकांची यादी झरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन गेडाम यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना पाठवली. मात्र सदर यादीची मूळ प्रत अगदी थोड्या वेळातच काही व्हाट्सप ग्रुपवर वेगाने व्हायरल झाली.
व्हॉट्सऍप स्टेटसवरही यादी
लोकांनी ही यादी वैयक्तिक अकाउंटवर तर फॉरवर्ड केलीच शिवाय काही महाभागांनी ही यादी चक्क आपल्या स्टेटसवर अपलोड केली. नाव जाहीर झाल्याने काही लोकांना याच मानसिक त्रास झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे मार्गदर्शन तत्वानुसार ही यादी जाहीर करता येत नाही. मात्र संपर्कातील लोकांचे नाव पूर्ण जिल्ह्यात उघड झाल्याने त्यांच्या खासगी अधिकारांचे हनन झाले आहे.
यादी कुठून व्हायरल झाली याची कल्पना नाही – डॉ. गेडाम
मृत कोरोना व्यक्तीच्या संपर्कातील लोकांची यादी मी फक्त आणि फक्त उपजिल्हाधिकारी केळापूर, जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ, जिल्हाआरोग्य आधिकारी यवतमाळ, निवासी वैद्यकीय अधिकारी, नोडल ऑफीसर, जिल्हा शल्य चिकि. यवतमाळ, तहसीलदार झरी जामनी व नायब तहसीलदार खिरेकार फक्त ऐवढयाच लोकाना मी वॉट्सअप वर पाठविले. या व्यतिरिक्त कोणालाही हा गोपनीय पत्र पाठविला नाही किंवा दाखविली नाही. त्यामुळे हा पत्र सोशल मीडियावर कुठून व्हायरल झाला याची कल्पना नाही.
– डॉ. मोहन गेडाम, तालुका वैद्यकीय अधिकारी, झरी
आपत्ती व्यवस्थापन कायद्यानव्ये कोरोना पोजिटिव्ह रुग्ण, कुटुंब, नातेवाईक व संपर्कातील लोकांचे नाव जाहीर उघड करणे, वृत्तापत्रात प्रकाशित करणे, सोशल मीडियावर व्हायरल करणे हे शासनाने दिलेल्या गाईडलाईनचे उल्लंघन आहे. मात्र या प्रकरणात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी यांना दिलेले अति गोपनीय पत्र सोशल मीडियावर व्हायरल करणारे व त्या पत्राला फॉरवर्ड करणारे महाभाग कोण कोण ? याची तपास करून त्यांच्या विरुद्द गुन्हा दाखल करावे अशी मागणी होत आहे. या प्रकरणी आपले सरकार पोर्टलवर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारसुद्धा करण्यात आली आहे.