वणीतील भाजी मार्केटमध्ये घाणीचा ‘बाजार’

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, विक्रेत्यांमध्ये संताप

0

जब्बार चीनी, वणी: गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस पडल्याने या भाजी बाजारात चिखलच चिखल साचले आहे. अशा अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त जागेतून भाजीपाला खरेदी करावा तरी कसा, असा प्रश्न सध्या ग्राहक करीत आहे. स्वच्छ वणी, सुंदर वणीची स्वप्नं दाखविणा-यांना हे दिसत नाही का असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

शहरातील मुख्य भाजी बाजार कोरोनामुळे मागील तीन महिन्यांपासून कृषि उत्पन्न बाजार समितिच्या प्रागणांत हलविण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात शहराच्या चिल्लर भाजीविक्रेते, ग्रामीण भागातील भाजीपाला खरेदी व विक्रीसाठी हाच एकमेव बाजार आहे. मात्र, हा बाजार भाजीखरेदी करणाऱ्या नागरिकांसाठीच त्रासदायक ठरत आहेत. सध्या या बाजारात पावसामुळे चिखल साचले असून तिथे दुर्गंधी पसरली आहे.

चिखल, घाणीने माखलेल्या रस्त्यावर हा भाजीपाला विकला जातो. भाजीपाला नाशवंत आहे. त्यामुळे दररोज त्याची खरेदी-विक्री होणे अपेक्षित आहे. चिखल पाहूनच अनेक ग्राहक बाहेरूनच परत जात आहेत. अशातच विक्री न झालेला भाजीपाला त्यांना फेकून देण्याची वेळ आली आहे. अगोदरच येथे व्यवसाय करण्यासाठी तीन ते चार तास मिळतात त्याचातही असा प्रकार होत असेल तर यात नुकसान भाजी विकायला येणा-या कास्तकारांचे आहे.

बाजारात शेकडो विक्रेते आहेत. पण प्रशासनाला त्यांच्याकडून तिथे कोणतीच सोय नाही. बाजार समिति म्हणते आमचे काम नाही तर मुख्याधिकारी काहीच ऐकायला तयार नाही. विक्रेते म्हणतात आम्हाला आमच्या जुन्या जागेवर तरी जा‍ऊ द्या. काबाडकष्ट करून शेतकरी आपल्या शेतात भाजीपाला पिकवत असतो. त्याचा दर्जा उत्तम राहावा म्हणून डोळ्यांत तेल घालून त्याची राखण करतो. मात्र, शेतक-यांकडून खरेदी केलेल्या भाजीपाल्याची विक्री करताना प्रशासनाकडून कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे विदारक चित्र इथे दिसून येत आहे. त्यामुळे स्वच्छ वणी, सुंदर वणीचे स्वप्न म्हणजे हेच का असा प्रश्न विचारला जात आहे.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.