दरोडा प्रकरणी 2 दोषींना सश्रम कारावासाची शिक्षा

सात महिन्यांपूर्वीची घटना. मारेगाव न्यायालयाचा निकाल

0

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव न्यायालयात एका दरोडा प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मारेगाव ए. डी. वामन यांनी एक वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आज गुरुवारी दिनांक 9 जुलै रोजी हा निकाल सुनावण्यात आला. बिजय मारिगा प्रधान व आर. रविकुमार आर. मोहन रा. ओडिशा असे दोषींचे नावे आहेत.

अलका रविन्द्र ढवस या वणी येथील रहिवासी आहे. सगणापूर हे त्यांचे माहेर आहे. त्या दिनांक 21 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास भाऊ संतोष मत्ते यांच्या सोबत दिवाळी सणाकरीता माहेरी येत होत्या. दरम्यान त्यांच्या भावाने मारेगाव येथील स्टेट बँकेतून 50 हजार रुपये काढले.

त्यांनी सदर रक्कम बँकेतच मोजली. त्यावेळी बँकेत लोक जमलेले होते. त्यांच्या खिशात आधी 1320 रुपये होते. 1350 व 50 हजार असे त्यांनी 51320 रूपये पिशवीत ठेवले व ती पिशवी त्यांनी त्यांच्या बहिणीकडे दिली. घरी परतत असताना मार्डी रोडवरील पतंजली दुकाना समोर त्यांनी त्यांची दुचाकी उभी ठेवली व ते तेलाचे पाऊच घेण्यासाठी किराना दुकानात गेले.

त्यावेळी अचानक एक निळ्या रंगाची पल्सर मोटार सायकल त्या ठिकाणी आली. त्या गाडीवर दोन मुले बसलेले होते. त्यापैकी मागे बसलेला मुलगा घाईत खाली उतरला. त्याने अलका  यांच्या जवळची पैशाची पिशवी बळजबरीने हिसकावली. बॅग  हिसकवल्यानंतर तो लगेच मित्रासोबत पसार झाला. त्यावेळी अलका यांनी आरडा ओरड केली. मात्र तोपर्यंत दोघेही दरोडेखोर पसार झाले.

प्रातिनिधिक फोटो

सदर घटनेची तक्रार अलका ढवस यांनी पोलीस स्टेशन मारेगावला दिली होती. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरूद्ध भा. दं. वि.चे कलम 392, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास पो. हवा. आनंद अलचेवार, पोलीस उपनिरीक्षक अमोल चौधरी यांनी केला.

पोलिसांनी गुन्हातील आरोपींना अटक करुन या दोन्ही आरोपींकडून ४७२३०/- रुपये जप्त केले. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने फिर्यादी, व तपास अधिकारी यांचे सह पाच साक्षदारांचे पुरावे नोंदविण्यात आले. साक्षीदारांचे बयाण ग्राह्य धरुन न्यायालयाने बिजय मारिगा प्रधान व आर. रविकुमार आर. मोहन यांना एक वर्षांचा सश्रम कारावास व प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड सुनावला. हे दोघेही ओडीशा येथील रहिवासी आहेत.

सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील पी. डी कपूर व कोर्ट पैरवी म. पोका. संगीता दोरेवार यांनी काम पाहीले.

Leave A Reply

Your email address will not be published.