कृषी औषधींची अनधिकृतरित्या विक्री करणा-या टोळीचा पर्दाफाश
वरझडीच्या जंगलात कारवाई, सव्वा लाखांची औषधी जप्त
सुनिल पाटील, वणी: तालुक्यात कृषी औषधांची विनापरवाना विक्री करणा-या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. पंचायत समितीच्या कृषी विभागाने वरझडी येथे धाड मारून अनधिकृतरित्या कृषी औषधांची विक्री करणा-या दोघांना रंगेहात पकडले. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून ते तेलंगणातील अदिलाबाद जिल्ह्यातील आहे. त्यांच्याकडून सुमारे सव्वा लाखांची औषधी जप्त करण्यात आली.
मंगळवारी दिनांक 21 जुलै रोजी कृषी अधिकारी (वि घ यो) यांना वरझडीच्या जंगलात कीटकनाशकाची अऩधिकृतरित्या विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांच्या सूचनेनुसार ता. कृषी अधिकारी सुशांत माने, कृषी सहायक ललीत कायंदे, पोलीस नाईक सुगत दिवेकर व पोलीस कॉन्स्टेबल अमित पाटील हे वरझडी येथील जंगलात गेले. तिथे त्यांना एक लाल रंगाची टाटा सुमो (MH 34 AA 5117) संशयास्पदरित्या आढळून आली. त्या गाडीजवळ तीन व्यक्ती होत्या. त्यांनी या गा़डीची झडती घेतली असता गाडीच्या डिक्कीत विविध कंपनींची कृषी औषधी आढळून आली. तिथे उपस्थित व्यक्तींजवळ कीटकनाशकाबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे याच्या विक्रीचा परवाना नसल्याचे त्यांनी सांगतले. त्यावरून पोलिसांनी तिथे असलेले तिघांना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अशन्ना पोशटी आम्रा (36) रा. बेला जिल्हा अदिलाबाद. विनोद दुर्गन्ना बिरजोवाल (36) रा. बेला जिल्हा अदिलाबाद व या गाडीचा ड्रायव्हर असलेला शेख जबी अहमद रा. बेला जि. अदिलाबाद यांचा समावेश आहे. सदर कीटकनाशके विक्रीसाठी आणले असल्याची कबुली आरोपींना दिली. अशन्ना याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 48 हजार 50 रुपये रोख आढळून आले. या रोख रकमेसह 1.25.464 रुपयाचे कीटकनाशक व 2 लाख रुपयांची जुनी टाटा सुमो असा एकूण 3,73,514 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेले प्रोफेक्स सुपर, टॉगल प्लस, डी कॉट, बायोस्पार्क, स्कोडा, टेक्सा, रक्षा, एक्झोडस, स्कॅपर इत्यादी औषधांची नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी तिन्ही आरोपींवर कीटकनाशक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कीटन नाशके कायदा 1968 कलम 29 (1) (सी), व 29 (1) (एफ) (आय) नुसार शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.
आरोपीच्या बचावासाठी एका नेत्याची फिल्डिंग?
अटक करण्यात आलेला एक आरोपी हा झरी तालुक्यातील एका पक्षाच्या नेत्याचा नातेवाईक आहे. त्यामुळे त्याच्या बचावासाठी काँग्रेसच्या एका युवा नेत्याने शिरपूर पोलीस स्टेशनला धडक दिल्याची माहिती आहे. एकीकडे शेतक-यांना खते मिळत नसताना अशा प्रश्नावर चुप्पी साधणारे नेते मात्र एका आरोपीच्या बचावासाठी फिल्डिंग लावत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.