तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील बोरगाव (मेंढोली) येथील शेतकऱ्याचा ओढ्याच्या (नाला) पुरात वाहून मृत्यू झाला. नारायण काळे (60) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सदर घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.
दि. 22 बुधवारला दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान मेंढोली, बोरगाव, पिंपरी आदी गाव शिवारात मुसळधार पाऊस पडला. यावेळी परिसरातील नाल्या, ओढ्यांना प्रचंड पूर आला. दरम्यान पाऊस कमी पडताच गुरे चारत असलेले नारायण काळे हे गावाकडे येण्यासाठी निघाले. मात्र वाटेत येणारा ओढा (नाला) पार करताना ते पुराच्या प्रवाहात वाहून गेले. यावेळी गुरे ओढा ओलांडून घराकडे आली. मात्र नारायण घरी परत आले नाही.
ग्रामस्थ आणि घरची मंडळी त्यांचा शोध घेत होती. संध्याकाळी सहाच्या दरम्यान नारायणचा मृतदेह ओढ्यात आढळून आला. नारायण हे अविवाहित होते व जन्मतःच मूकबधिर होते. ते त्यांचा पुतण्या प्रकाश काळे यांच्याकडे राहत होते. घटनेची माहिती पोलीस पाटील प्रदीप बलकी यांनी शिरपूर पोलिसांना दिली. शिरपूर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविला आहे.