सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील आरसीसीपीएल कंपनीतील तीन कामगारांना कोरोनाची लागण झाल्याने मुकुटबन ग्रामवासी संतप्त झाले आहे. आज त्यांनी सदर सिमेंट कंपनी एक महिण्याकरिता सील करण्याची मागणी करत याबाबत तहसिलदारांना निवेदन दिले आहे.
२५ जुलैला उत्तरप्रदेश येथून २७ कामगार खाजगी ट्रॅव्हल्सने मुकुटबन येथिल सिमेंट कंपनीत कामाकरिता आले. २६ जुलैला त्यांच्या तपासणी करीता झरी येथे नेण्यात आले. सर्वांच्या तपासणी करून स्वॅब पाठविण्यात आले. त्यात ३ रुग्ण पॉजिटिव्ह मिळाले. त्यामुळे मुकुटबनवासियांमध्ये दहशत पसरली आहे.
सिमेंट कंपनीत परप्रांतीय लोकांचा भरणा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, झारखंड व इतर अनेक राज्यातील कामगार खाजगी ट्रॅव्हल्सने या कंपनीत सतत येत आहे. यातीलच तीन कामगार पॉजिटिव्ह निघाले ज्यामुळे कंपनीतील इतर कामगार व मुकुटबन ग्रामवासीयांना कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. याच अनुषंगाने ग्रामपंचायत मध्ये तालुका व ग्राम दक्षता समितीची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत तहसीलदार रामचंद्र खिरेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम, गटविकास अधिकारी सुधाकर जाधव, ठाणेदार धर्मा सोनुने, डॉ पंडित, सरपंच शंकर लाकडे, पोलीस पाटील दीपक बरशेट्टीवार, तलाठी राणे व आशा वर्कर उपस्थित होते. बैठकीत कोरोनावर मात करण्याकरिता उपाययोजना आखण्यात आल्या व गावकर्यांनी तोंडावर मास्क बांधावा वेळोवेळी हात सैनिटायजरने धुवावे सोशल डिस्टसिंग ठेवावे अश्या अनेक सूचना देण्यात आल्या.
मिटिंग संपताच ग्रामवासीयांनी आलेल्या समितीच्या अधिकारी यांना गावातील सिमेंट फॅक्टरीला एक महिण्याकरिता सील करा, कंपनीतील एकही कामगार कर्मचारी किंवा अधिकारी गावात येणार नाही अशी मागणी केली. कंपनीला सील किंवा बंद करण्याचे आदेश मला नसल्याचे तहसीलदार खिरेकर यांनी सांगितले. कंपनीला आरोग्य विभाग व ग्रामपंचायत यांनी वेळोवेळी पत्र देऊनही कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मुकुटबन वासियांना धोका निर्माण झाला आहे असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.