वणीत कोरोनाचा उद्रेक, एकाच दिवशी आढळले 10 रुग्ण

वणीत सुरू झाली पाचवी साखळी...

0

जब्बार चीनी, वणी: वणीत गुरुवारी दिनांक 30 जुलै रोजी कोरोनाचा उद्रेक झाला. एका दिवशी तब्बल 10 जणांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतल्याने वणीकरांसह प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये तेली फैल येथील 6 पुरुष व 3 महिला व चिखलगाव येथील एका महिलेचा समावेश आहे. आजपर्यंत वणीत केवळ चार साखळी होती. आज चिखलगाव येथे नवीन रुग्ण आढळून आल्याने वणीत कोरोनाची नवीन साखळी तयार झाली आहे. आज एकाच दिवशी 10 रुग्ण आढळल्याने वणीत कोरोनाचे एकूण 36 रुग्ण झाले आहेत. 

वणीत सुरू झाली पाचवी साखळी…
वणीत कोरोनाच्या वरोरा रोड, पेट्रोल पम्प, साई नगरी, राजूर अशा चार साखळी तयार झाल्या होत्या. त्यात आज चिखलगाव येथे नवीन रुग्ण आढळल्याने पाचवी साखळी तयार झाली आहे. चिखलगाव येथील महिला नाशिकला भावाकडे गेली होती. तिथून परतल्यावर तिच्या भावाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान महिलेला देखील स्वत:मध्ये कोरोनाचे लक्षणं असल्याचे जाणवले. त्यामुळे त्या महिलेच्या कुटुंबीयांनी याबाबत प्रशासनाला माहिती दिली होती.

प्रशासनाने त्या महिलेला होम कॉरन्टाईन करत दोन दिवसांआधी या महिलेचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळला पाठवले होते. आज या महिलेचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला. ही नवीन साखळी असल्याने वणीत एकूण 5 साखळी तयार झाली आहे. यातील पहिली (वरोरा रोड) व तिसरी (साई नगरी) ही साखळी खंडीत झाली आहे. तर दुसरी साखळी तेली फैलात चांगलाच हौदोस घालीत आहे. चौथी (राजूर) येथील साखळीमुळे कुंभा येथील एक पुरुष पॉजिटिव्ह आला आहे.

आज कोरोनाने वाढवली सर्वांचीच डोकेदुखी
संसर्ग सुरू झाल्यापासून आज पहिल्यांदा एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळले आहेत. तेलीफैलात कोरोना एका कुटुंबातून दुस-या कुटुंबात जाताना दिसत आहे. कालपर्यंत केवळ 4 रुग्ण ऍक्टिव्ह होते. आज त्यात आणखी 10 रुग्णांची भर पडली आहे. त्यातच चिखलगाव येथे नवीन साखळी तयार झाली आहे. एकीकडे कोरोनाचे संकट कमी होत असतानाचे चित्र दिसत असताना केवळ हलगर्जीपणामुळे हे संकट अधिक गहिरे होत आहे. परिणामी वणीकरांची तर चिंता वाढली आहे शिवाय प्रशासनासमोरही एक आव्हान निर्माण झाले आहे.

वणीत सध्या 14 ऍक्टिव्ह रुग्ण
काल वणीत गेल्या 14 दिवसांपासून उपचार सुरू असलेल्या दोन पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. यात एक 10 वर्षांचा मुलगा असून दुसरी 13 वर्षांची मुलगी आहे. सध्या वणीत एकूण 36 पॉजिटिव्ह व्यक्ती झाल्या असून त्यातील 21 जणांनी कोरोनावर मात केली आहे. एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या 14 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. दरम्यान ज्या संशयीतांचे स्वॅब पाठवण्यात आले होते त्यातील 77 व्यक्तींचे अहवाल येणे बाकी होते, त्यातील आज 10 व्यक्तींचे रिपोर्ट पॉजिटिव्ह आले आहेत. आज 35 आणखी स्वॅब पाठवण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.