पिंपरी (कायर) येथे बांधावर जाऊन शेतीपयोगी प्रात्यक्षिक
कृषी महाविद्यालयात शिकणा-या विद्यार्थ्याचा अभिनव उपक्रम
विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील पिंपरी (कायर) येथील सुरेश विजय बांदुरकर या कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांने परिसरातील शेतामध्ये शेतीपयोगी प्रात्यक्षिकांचे करून दाखवले. या कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांना फवारणी करताना घ्यावयाची काळजी, विषबाधा झाल्यास करावयाचे उपचार, 5 % निंबोळी अर्काची निर्मिती, दशपर्णी अर्काची निर्मिती, कीड नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा उपयोग यांसारख्या विषयावर प्रात्यक्षिक करून शेतक-यांना मार्गदर्शन केले.
सुरेश हा धामनगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथे कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे शाळा कॉलेज बंद असल्याने तो आपल्या गावी पिंपरी (का) येथे आला आहे. आपल्या शिक्षणाचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे यासाठी त्याने थेट शेतक-यांच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला कृषी सहाय्यक वनकर, समूह सहायक पावडे यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाचा आयोजनासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष, प्राचार्य, प्राध्यापक वृंद यांचे मार्गदर्शन सुरेशला लाभले.