जब्बार चीनी, वणी: आज वणीत कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला आहे. सदर रुग्ण महिला असून रजा नगर येथील रहिवाशी आहे. रॅपिड ऍन्टिजन टेस्टमध्ये ही महिला पॉजिटिव्ह आढळून आली आहे. रजा नगरमध्ये आधी आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील ही रुग्ण आहे. आज वाढलेल्या एका रुग्णामुळे वणी तालुक्यात एकूण रुग्णांची संख्या 56 झाली आहे.
रजा नगर येथील एक व्यक्ती बिहारला गेली होती. बिहारमधून परत येताच त्या व्यक्तीने टेस्ट केली असता गुरुवारी ती व्यक्ती पॉजिटिव्ह निघाली होती. प्रशासनाने त्याच्या संपर्कातील व्यक्तींना कॉरन्टाईन केले होते. आज त्यातील एक व्यक्ती पॉजिटिव्ह आली आहे. रजा नगर ही नवीन साखळी होती. त्या साखळीत आता दोन रुग्ण झाले आहेत.
शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा मोर्चा
वणी शहरात तेली फैलात कोरोना तांडव करत असताना आता रजा नगर येथे दोन रुग्ण झाले आहेत. आता पर्यंत ग्रामीण भागात योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याने कोरोनाला वेशीवरच रोखण्यात गावक-यांना यश आले होते. मात्र आता राजूर, घोन्सा नंतर आता चिंचोली गावात कोरोनाने प्रवेश केला आहे. याशिवाय वणी शहरा लगत असलेल्या गणेशपूर व चिखलगाव येथे ही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण आहे.
वणी तालुक्यात एकूण 56 रुग्ण आढळले असून त्यातील 49 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या 5 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. यातील 4 जणांवर वणी येथील कोविड केअर सेन्टरमध्ये तर एका व्यक्तीवर यवतमाळ येथील जीएमसीमध्ये उपचार सुरू आहे.