शासनाचे नियम पाळत पोळा सण उत्साहात साजरा
सरपंच, ठाणेदार, पोलीस पाटील व तरुण पत्रकारांचे मोठे सहकार्य
सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत कोणत्याही गावात सार्वजनिक पोळा भरविण्यात असला नाही व कुठेही वादविवाद नसल्याचे पहायला मिळाले. तालुक्यात मुकुटबन सर्वात मोठं गाव असून सरपंच शंकर लाकडे, ठाणेदार धर्मा सोनुने, पोलीस पाटील दीपक बरशेट्टीवार व गावातील सर्व तरुण पत्रकार यांनी गावातील शांती भंग होऊ नये याकरिता विशेष लक्ष दिले.
गावातील सर्व शेतकऱ्यांनी आपली परंपरा राखत व शासनाच्या आदेशाचे पालन करीत सार्वजनिक पोळा न भरविता आपआपल्या बैलजोडी सजवून घरीच पूजा करून पोळा साजरा केला. घरीच गोडधोड करून लोकांनी या वर्षीचा पोळा साजरा केला. सरपंच शंकर लाकडे यांनी ग्रामपंचायत कर्मचारी यांना विशेष लक्ष ठेवण्याचे सांगितले होते. गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व ग्रामवासीयांचे मोठे सहकार्य लाभले.
कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता जिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक पोळा सण भरविण्यावर बंदी घातली होती. त्याच अनुषंगाने पोलीस विभाग, ग्रामपंचायत यांना पत्र देऊन सूचित करण्यात आले होते की सार्वजनिक पोळा भरविण्यात येऊ नये. सर्व शेतकऱ्यांनी आपली बैलजोडी सजवून घरीच पूजा अर्चना करून पोळा साजरा करण्याचे आदेश धडकले होते.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करीत ठाणेदार धर्मा सोनुने यांनी सर्व पोलीस पाटील गणेश मंडळाचे पदाधिकारी यांची मिटिंग घेऊन कोणत्याही गावात सार्वजनिक पोळा भरणार नसल्याच्या सूचना पोलीस पाटील यांना देऊन गावकर्यांना सांगा असे मिटिंग दरम्यान सांगण्यात आले होते.