मांगली (हिरापूर) येथील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू
डॉक्टर सुटीवर असल्याने महिला उपचाराविना, वाटेत मृत्यू
सुशील ओझा, झरी: मांगली (हिरापूर) येथील एका महिलेचा रविवारी 23 ऑगष्ट रोजी सर्पदंशाने मृत्यू झाला. रात्रीच्या दरम्यान ही घटना घडली. दरम्यान या महिलेला मुकुटबन येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र तिथे डॉक्टर नसल्याने त्या महिलेला वेळेवर उपचार मिळाला नाही. दरम्यान या महिलेला वणी येथे उपचारासाठी घेऊन जाताना वाटेतच मृत्यू झाला.
भीमाबाई संभा टेकाम (46) ही महिला मांगली (हिरापूर) येथील रहिवाशी होती. रविवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास ती घरी झोपून असताना तिला सर्पदंश झाला. ही बाब लक्षात येताच तिच्या कुटुंबीयांनी तिला तात्काळ मुकुटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
परंतु तिथे डॉक्टर सुट्टीवर आहेत, असे सांगून त्यांना तिथून परत पाठविण्यात आले. महिलेची प्रकृतीची चिंताजनक असल्याने तिला मुकुटबन येथील एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी रुग्णाला तपासून त्यांना वणी येथे हलवण्याचा सल्ला दिला.
रुग्णाला घेऊन वणी घेऊन जात असताना वाटेतच कायर ते पेटूर वाटेतच भीमाबाईचा मृत्यू झाला. वणी येथील शासकिय रुग्णालयात घेऊन आले असता डॉक्टरांनी भीमाबाईला मृत घोषीत केले.
दोन वर्षांआधी भीमाबाईंच्या पतीचा मृत्यू
भीमाबाईच्या पतीचे दोन वर्षापूर्वी अंगावर वीज कोसळून दुदैवी मृत्यू झाला होता आणि आता भीमाबाईचा सर्पदंशाने मृत्य़ू झाला आहे. सदर परिवार मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. वडिलांनंतर आता आईचाही मृत्यू झाल्याने त्यांचे तिन्ही मुले पोरके झाले आहेत. भीमाबाईच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मुकुटबन येथील आरोग्य केंद्राबाबत संताप
मुकुटबन येथील आरोग्य केंद्रात रात्री कोणताही रुग्ण गेला असता डॉक्टर उपलब्ध नसतात. रुग्णांचे नातेवाईक ओरडून ओरडून आवाज देतात. परंतु तिथे असलेले कुणीही झोपेतून उठत नाही. दवाखान्यातील चपराशी किंवा नर्स उठल्यास रुग्णांना वणी येथे किंवा खासगी दवाखान्यात रेफर करण्याचा सल्ला देतात. या भोंगळ कारभारामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे. एवढया मोठ्या गावातील दवाखान्यातील अशा बेजबाबदारीकडे लोकप्रतिनिधी सह वरिष्ठ अधिकारी यांचेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मुकुटबन वासियांमध्ये संताप व्यक्त होत आहे.