विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील शिरगिरी येथील इंदिरा सूतगिरणी मधून काही चोरट्यांनी 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान टिनपत्रे, लोखंडी अँगल व इतर साहित्य चोरून नेले. याबाबत वणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी वणी पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 11 लाख 40 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. न्यायालयीन निर्णयानुसार यातील 8 आरोपींना यवतमाळ कारागृहात पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
शहरापासून जवळच असलेल्या मुकुडबन रोडवरील शिरगिरी या गावात इंदिरा सूतगिरणीचे काम सुरू आहे. या सूतगिरणीतून 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान अज्ञात चोरट्यांनी 4 टिनपत्रे, लोखंडी अँगल व इतर साहित्य असा एकूण 52 हजार 500 रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची तक्रार प्रफुल्ल उपरे यांनी केली होती. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपींचा शोध घेण्याची जबाबदारी डीबी पथकावर टाकण्यात आली. त्यांनी 21 ऑगस्ट रोजी केसुर्ली जंगल शिवरातून लोखंडी गज, अँगल व पीक अप वाहन (MH 34 AV 0315) असा मुद्देमाल जप्त केला. तर 25 ऑगस्ट रोजी प्रशांत संजय बेसरकर (30) रा. सुकनेगाव ता. वणी याच्याकडून 4 नग 30 फुटी टिनपत्रे किंमत 4 हजार रुपये जप्त करण्यात आले.
राजू मधुकर झिलपे (23) रा. रंगनाथ नगर, सत्यम शैलेंद्र शेलार (22) रा. इस्लामपुरा वणी, रिजवान शाह जिगर शाह (26) अमरावती जिल्हा हल्ली मुक्काम वणी, शेख शाहरुख शेख सलीम (21) खडबडा, शेख जावेद शेख सलीम (24) खडबडा, शंकर भीमराव दारुंडे (19) रा. खडबडा, मोहम्मद रिजवान मोहम्मद हनिफ (25) पंचशील नगर, शाम वासुदेव चोखारे (29) पंचशील नगर असे आरोपींचे नावं आहेत.
सर्व आरोपींकडून 25 नाग प्लॅस्टिक खुर्च्या किंमत 600 रुपये, एक जुनी गॅस शेगडी व इतर सामान किंमत 1100 रुपये, व गुन्ह्यात उपयोगात आणलेले पीक अप वाहन किंमत 7 लाख रुपये असा एकूण सर्व आरोपींकडून 11 लाख 40 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यातील शाम वासुदेव चोखारे याला जमानत मिळाली आहे तर इतर 8 आरोपींना प्रथमवर्ग न्यायालयाने यवतमाळ येथील जिल्हा कारागृहात पाठविण्याचा आदेश दिला आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी प्रमुख गोपाल जाधव, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, हरींद्र भारती, अमित पोयाम, पंकज उंबरकर यांनी केली.