अहेरअल्ली जिल्हा परिषद शाळेत ऑनलाईन शिक्षकदिन साजरा
शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मांडलेत विविध विचार
सुशील ओझा, झरी: अहेरअल्ली येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळेने ऑनलाईन शिक्षकदिन साजरा केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक भोयर होते . प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे, केंद्रप्रमुख नराजें, शिंदीवाढोणाचे मुख्याध्यापक सुनील वाटेकर, भीमनाळा शाळेचे मुख्याध्यापक काळे, शंकर केमेकार तथा सहाय्यक शिक्षिका सुरेखा बोडणकर, संगीता गड्डमवार, पुष्पलता कुतरेकर व माता पालकसंघाच्या अध्यक्षा दर्शना मन्ने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन अनुश्री भोयर हिने केले. विद्यार्थांनी वेगवेगळ्या भाषा वापरून शिक्षकदिनाची माहिती व शुभेच्छा दिल्यात. यात श्रृती राऊत, तनवी भोयर, संध्या केळवतकर, ईश्वरी केळवतकर, शिल्पा शिरपुरे, सुप्रिया ठाकरे, आरुषी केमेकार, त्रिशा राऊत, तृप्ती मन्ने यांनी मनोगत व्यक्त केलेत. अनुष्का मन्ने हिने एक सुंदर गीत सादर केले .
गटशिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थाना मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथींच्या मार्गदर्शनाने मुलांना प्रेरणा मिळाली. जि. प. उच्च प्राथमिक शाळा वेगवेगळ्या स्तरांवर अनेक उपक्रम राबवत असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. सर्व विद्यार्थी दीक्षा अॅप वापरत असल्याचेही त्यांनी सांगीतले. ८० % विद्यार्थी अॅण्ड्रॉईड मोबाईलधारक असल्याचेही त्यांनी सांगीतले. ऑनलाईन क्लास दररोज सकाळी १ तास व रात्री १ तास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
फेलो ट्रॅव्हलर ईन इंग्लीश हा एक उपक्रम सध्या सुरू आहे. सोबतच व्हिलेज गो टू स्कूल या धर्तीवर ” शाळा आली माझ्या अंगणी ” हा अध्ययनपूरक उपक्रम सध्या सुरू आहे. यामध्ये संपूर्ण गावातच शैक्षणिक वातावरण तयार करण्यात आले आहे. गटनिहाय विद्यार्थी अभ्यासाला बसतात. भाषा साहित्य पेटी व गणित साहित्य पेटी गटनायक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्यात. त्यांचा नित्य उपयोग व वापर सुरू आहे. ऑनलाईन वर्गाचा प्रचंड फायदा मुलांना होत असल्याचा आशावाद पालकांनी व्यक्त केला.
शाळेच्या प्रगतीसाठी समस्त शा.व्य. समिती माता पालकसंघ व समस्त पालक शिक्षकांच्या पाठीशी उभे असल्याचे मत दर्शना मन्ने व अध्यक्ष दीपक भोयर यांनी सांगीतले. पुढे भविष्यात अनेक उपक्रम राबविण्याच्या तयारीत असल्याचे, त्यातही प्रामुख्याने विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी वाचनीय गोष्टीच्या पुस्तकांचे “झोळीवाचनालय ” हा उपक्रम लवकरच सुरू करू असे मत मुख्याध्यापकांनी मनोगतातून केले .
कोरोनाने साऱ्या जगाला आरोग्याच्या बाबतीत हादरवून सोडलं. अभ्यासाच्या बाबतीत आम्हाला नक्कीच ही एक नवीन संधी आहे, असे मनोगत शिक्षकवृद शंकर केमेकार, सुरेखा बोडणकर, संगीता गड्डमवार, पुष्पलता कुतरेकर यांनी व्यक्त केले .
कार्यक्रमाच्या शेवटी वर्ग ७ वीच्या विद्यार्थ्यानींनी आम्ही एके दिवशी नक्की यशस्वी होऊ हा संदेश देण्यासाठी ‘व्ही शाल ओव्हरकम’ या गीताचे सामूहीक गायन केले. सर्वांना धन्यवाद देऊन शिक्षकदिनाच्या शुभेच्छा दिल्यात. आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली .