सुशील ओझा, झरी: झरी ही तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. परीसरातील हजारो नागरिक खरेदी करिता याच मार्गाने येत असतात. तसेच झरी हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे प्रशासकीय व खाजगी कामाकरिता झरी येथे जावे लागते. मात्र या सर्व कामाकरिता मुकुटबन ते मार्कीवरून झरी या मुख्य रस्त्याचा वापर होत असतो.
कोरोनाच्या काळाच्या आधी या रस्त्याचे काम हे वेगाने सुरू होते. ते काम आता बंद आहे. यातच हा मार्ग मार्की ते अर्धवनपर्यंत साधी चुरी टाकून काही प्रमाणात झाला. अर्धवन ते रुईकोटपर्यंतचा रस्ता हा पूर्णपणे मोठमोठ्या खड्यांचा झाला आहे. या खड्यांत पाणी साचतं. या रस्त्याला शेतात जाण्याच्या पांदण रस्त्याचे स्वरूप आले.
त्या खड्ड्यांतील पाणी आपल्या अंगावर न येऊ देण्यासाठी अनेक दुचाकीस्वारांची सर्कस सुरू आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना पाठीचा, मणक्याच्या त्रास होत आहे. अनेक नागरिकांना आपले वाहन चालवण्यास मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर काही लहान, मोठया वाहनाचे इंजीन हे जमिनीला लागत असल्याच्यासुद्धा तक्रारी होत आहेत.
प्रशासन मोठ्या जीवितहानीची तर प्रतीक्षा करीत नाही आहे ना? असा सवाल आता नागरिकांच्या चर्चेत रंगत आहे. या मार्गाचे काम पूर्ण करावे अशी मागणी जनतेकडून होताना दिसत आहे.