रवी ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रासा परिसरात अवैध दारू तस्करी करणाऱ्या दोघांना वणी पोलिसांनी रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याजवळून 288 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
वणी तालुक्यातील रासा गावातील तरुण आता दारू तस्करीकडे वळल्याचे दिसायला लागले आहेत. ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांना रासा गावाकडे दुचाकीने दारू नेत असल्याची माहिती मिळाली. शासकीय वाहनाने परिसरात गस्तावर असलेले डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, शेख नफिस, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, उल्हास कुरकुटे, दिलीप जाधव यांना रासा गावाजवळील पेट्रोल पंप जवळ वणीकडून MH 27 M 2678 या दुचाकीवरून एक इसम 4 बॉक्स घेऊन येताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवून तपासणी केली असता रासा येथील सुभाष सांबशिव बोबडे (47) त्याच्याजवळ दारूच्या 192 बाटल्या सापडल्या. ही दारू 12 हजार रुपये किमतीची आहे.
सोबतच रासा येथून कुंभारखनी कडे जाणाऱ्या रस्त्यावर रासा येथीलच किशोर मोहन पांढरे (22) हा युवक 96 बाटल्यासह झुडुपाचा आधार घेऊन लपून बसला होता. पोलिसांनी त्याला ही अवैध दारुसह रंगेहाथ पकडले.
रासा गावातील दोघांवर वणी पोलिसांनी पाळत ठेऊन 288 दारूच्या बाटल्या व दुचाकी असा एकूण 38 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने केली आहे.