लोढा हॉस्पिटल येथे सुरू होणार डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल
जिल्हाधिका-यांचे आदेश, खासगी कोविड सेंटरच्या वादावर पडदा
विवेक तोटेवार, वणी: कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील 7 खासगी रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यात वणीतील लोढा हॉस्पिटलचाही समावेश आहे. गेल्या तीन दिवसांपासून खासगी कोविड केअर सेंटरबाबत शहरात हाय वोल्टेज ड्रामा सुरू होता. दरम्यान जिल्हा प्रशासनानेच लोढा हॉस्पिटलला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरू करण्याचे आदेश दिल्याने खासगी कोविड केअर सेंटरच्या प्रकरणावर पडदा पडला आहे. आता लोढा हॉस्पिटल येथे कोविड रुग्णांचे निदान, उपचार व देखभाल केली जाणार आहे. या निर्णयामुळे परिसरातील कोविड रुग्णांना चांगलाच दिलासा मिळणार आहे.
संपूर्ण राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. जिल्ह्यात देखील परिस्थिती हाताबाहेर जात आहे. सध्या आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती उद्भवली असल्याने राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा (1897) लागू करण्यात आला आहे. यानुसार प्रशासनाला अऩेक विशेषाधिकार मिळाले आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाने रुग्णांचे निदान, उपचार व देखभाल करण्यासाठी जिल्ह्यातील 7 खासगी रुग्णालयात कोविड हॉस्पिटल तयार करण्याचा आदेश जारी केला आहे. यात वणीतील लोढा हॉस्पिटलचाही समावेश आहे. या ठिकाणी तात्काळ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल तयार करण्याचे शासनाचे आदेश आहे. परसोडा येथील कोविड केअर सेंटरबाबत वाढत्या तक्रारी सुरू असताना जिल्हाधिका-यांच्या या निर्णयामुळे परिसरातील रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे.
खासगी कोविड केअर सेंटरचा वाद मिटला
गेल्या तीन चार दिवसांपासून खासगी कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत वाद सुरू आहे. यात राजकारण शिरल्याचा आरोपही होत आहे. झेडपी कॉलनीतील प्रस्तावित कोविड केअर सेंटरला स्थानिकांनी विरोध केल्यानंतर तिथे सेंटर सुरू करण्यास संचालकांनी स्थगिती दिली होती. पर्यायी जागा म्हणून शेतकरी मंदिराचाही विचार सुरू होता. मात्र आता शासनानेच लोढा हॉस्पिटलला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल जाहीर केल्याने या वादावर पडदा प़डला आहे.