सुप्रसिद्ध जादूगर तेजा यांचे निधन

चंद्रपूर येथे आजाराने निधन, परिसरात शोककळा

0

जब्बार चीनी, वणी: राजूर येथील रहिवाशी असलेले व विदर्भातील सुप्रसिद्ध जादूगर तेजकुमार परशराम उर्फ जादूगर तेजा यांचे शनिवारी रात्री चंद्रपूर येथे निधन झाले. ते 50 वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात आजारी असल्याने त्यांना चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

राजूर येथील निवासी असलेले तेजकुमार परशराम हे व्यवसायाने फोटोग्राफर होते. त्याचे राजूर येथे व्यावसायिक प्रतिष्ठाण होते. फोटोग्राफीसह त्यांना जादू या कलेचा छंद होता. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून ते जादूचे प्रयोग करायचे. केवळ विदर्भातच नाही तर देशभरात त्यांचे जादूच्या प्रयोगाचे स्टेज शो झाले आहेत. अलिकडेही खेड्यापाड्यात गणेशोत्सव, दुर्गाउत्सव येथे त्यांचे जादूचे प्रयोग व्हायचे.

तेजकुमारचे जाणे धक्कादायक – दिलीप अलोणे
एक कलावंत व जादूगर म्हणून तेजकुमारसोबत माझी 30 वर्षांपासूनची मैत्री होती. तेजा आज आपल्यात नाही यावर अद्यापही विश्वास बसत नाहीये. जिल्ह्यात केवळ मी आणि तेजकुमार दोघेच स्टेज शो करणारे जादूगर होतो. अनेक ठिकाणी आम्ही सोबत कार्यक्रम केलेत. माझ्या नकला तर तेजाच्या जादूच्या प्रयोगाचा एकत्र आनंद प्रेक्षकांनी अनुभवला आहे. त्याच्या प्रयोगातून त्याने त्याचं स्वत:चं एक विश्व निर्माण केलं होतं. जादू  ही कला टिकवण्यात व त्याचा प्रसार करण्यात तेजकुमारचा मोठा सहभाग होता. विदर्भाने केवळ एक कलावंतच नाही तर एक चांगली व्यक्ती देखील गमावली आहे. विदर्भ कलावंत संघातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.
– दिलीप अलोणे, विदर्भ कलावंत संघ

जादूगर तेजा यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा व मुलगी, भाऊ पुतण्या पुतणी असा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर आज चंद्रपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.