जितेंद्र कोठारी, वणी: केवळ शहरालाच नाही तर संपूर्ण जिल्ह्याला हादरवून ठेवणा-या मॅक्रून स्कूल व्हॅन अपघात प्रकरणाचा बुधवारी दिनांक 16 सप्टेंबर रोजी निकाल लागला. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय केळापूर यांनी आरोपी स्कूल व्हॅन चालक गणेश बोढणे याला 5 वर्षांची तर ट्रक चालक नियाज अहमद याला 2 वर्षाच्या कारागृहाची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयावर अपघातात मृत झालेल्या 4 निष्पाप शालेय चिमुकल्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केलं. मात्र चार वर्षापूर्वी 18 फेब्रुवारी 2016 चा “तो’ काळा दिवस आठवून करून आजही त्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रूंचे झरे वाहत आहे. पीडितांना न्याय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे विशेष सरकारी वकील ऍड विनायक काकडे यांचे देखील कौतुक होत आहे.
न्याय मिळाला पण…. – मृतकांच्या पालकांची प्रतिक्रिया
गेल्या साडेचार वर्षांपासून आम्ही कोर्टाच्या निकालाच्या प्रतीक्षेत होतो. विशेष सरकारी वकील विनायक काकडे यांच्या अथक मेहनतीने आज आम्हा पीडित कुटुंबियांना न्याय मिळाला. या प्रकरणी समाजातील सर्व घटकांकडून आम्हाला सहकार्य मिळाले. लोकप्रतिनिधी, आमदार, पत्रकार यांनी सुद्धा या कामात मोलाची मदत केली. पत्रकार तुषार अतकरे यांनीही बरीच मदत केली. संपूर्ण वणीकर जनता आमच्या पाठिशी उभी राहिली. 18 फेब्रुवारी 2018 चा तो दिवस आम्ही कधीही विसरू शकत नाही. आम्हास सोडून गेलेली आमची मुलं आम्हास कधीही परत मिळणार नाही. परंतु दोषी व्यक्तींना शिक्षा मिळाल्याने आम्ही समाधानी आहोत.
– रवींद्र उलमाले, प्रदीप हुलके, हिरामण देऊळकर, राजू काकडे
अपघातात मृत विद्यार्थ्यांचे वडील
ट्रक चालकास अधिक शिक्षा मिळायला हवी होती – ऍड काकडे
शासनाने मला विशेष सरकारी वकिलाचा मान देऊन हा खटला लढण्याची जवाबदारी दिली. सदर खटला मी नैतिक व सामाजिक जवाबदारी समजून लढलो. सदर खटल्यात आरोपी क्र. 1 ट्रक चालक नियाज अहमद याची कोर्टाने भादवी कलम 304 भाग 2 (सदोष मानव वध) या कलमेतून निर्दोष सुटका केली आहे. मा. कोर्टाने दिलेल्या निकालाची पूर्ण प्रत मिळाली नाही. निकालाचे वाचन करून आरोपी क्र. 1 विरुद्द शासनाने अपील करण्याचा सल्ला मा. जिल्हाधिकारी तसेच विधी व न्याय विभागाला देण्याचा माझा मानस आहे.
– ऍड. विनायकराव काकडे, वणी
ती थरारक घटना….
18 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 7.30 वाजता दरम्यान नेहमीप्रमाणे नांदेपेरा रोडवर लॉयन्स इंग्लिश मिडीयम स्कुल, स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल व वडगाव मार्गावरील मॅक्रून स्टुडेंट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना शाळेत सोडणाऱ्या स्कुलबस, व्हॅन व ऑटोची गर्दी होती. काही नागरिक मॉर्निंगवॉक करून परत घराकडे निघाले होते. तितक्यातच नांदेपेरा चौफुली पासून काही मीटर अंतरावर एक जोरदार आवाज वातावरणात गुंजल्यामुळे नागरिकांनी त्यादिशेने धाव घेतली. समोरचा दृश्य हादरून टाकणारे होते.
मॅक्रून शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक टाटा मॅजिक व्हॅन आणि कोळसा भरलेल्या एका टिप्पर मध्ये समोरासमोर टक्कर होऊन भीषण अपघात घडला होता. स्कूल व्हॅनमधील एका मुलाच्या डोक्याला जबर मार लागून त्याचा मेंदू बाहेर रस्त्यावर पडला. तर व्हॅनमधील इतर मुलं, मुली गंभीर जखमी झाले. घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी जखमी चिमुकल्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात तसेच लोढा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान गंभीर जखमी इतर तीन विद्यार्थीनीची प्राणज्योत मालविली. अपघातात गंभीर व किरकोळ जखमी 5 विद्यार्थ्यांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली.
अपघातानंतर वणी पोलिसांनी स्कुल व्हॅन चालक व ट्रक चालक विरुद्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. अपघातात मृत विद्यार्थ्यांचे कुटुंबीय मागील साडे चार वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत होते. अखेर आरोपींना शिक्षा मिळाली.
एकही रुपया न घेता लढवला खटला
परिसरात या अपघातामुळे संतापाची लाट उसळली होती. आरोपींना अधिकाधिक शिक्षा व्हावी यासाठी त्यावेळी अनेक निवेदन देण्यात आले तसेच आंदोलनही करण्यात आले. खटला योग्य पद्धतीने चालून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी शहरातील नामवंत विधिज्ञ ऍड. विनायक काकडे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी वणीकरांनी उचलून धरली होती. अखेर राज्य शासनाने त्यांनी विशेष सरकारी वकील नियुक्ती केली. तर तपास अधिकारी म्हणून वणी पो.स्टे. चे तत्कालीन ठाणेदार पो.नि. मुकुंद कुलकर्णी यांनी घटनेची कसून चौकशी करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र सादर केले. विशेष सरकारी वकील ऍड. काकडे यांनी शासनाकडून अथवा फिर्यादी यांचेकडून एकही रुपया फी न घेता मोफत खटला लढून न्याय मिळवून दिला हे विशेष.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)