विलास ताजने वणी: वणी तालुक्यात येत्या 7 ऑक्टोबरला 19 ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू केली आहे. परिणामी गावागावात निवडणूकी संदर्भात चर्चा रंगू लागल्या आहे.
वणी तालुक्यातील येत्या नोव्हेंबरमध्ये कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. 11 गावात 7 सदस्य व सरपंच, 7 गावात 9 सदस्य व सरपंच आणि एका गावात 17 सदस्य व सरपंच यांची निवड होणार आहे.
एका मतदाराला कमीत कमी तीन व जास्तीत जास्त चार मते द्यावी लागतील. एक मत थेट सरपंचपदासाठी असेल तर इतर मते सदस्यपदासाठी द्यावी लागेल.
सरपंचपदासाठी निवड थेट जनतेतून होत आहे. आजपर्यंत गावातील राजकीय पुढाऱ्यांनी अनेक हुशार, होतकरु तरुणांचा वापर सरपंच पदाचे गाजर दाखवत स्वतःसाठी करून घेतला. मात्र प्रसंगी आपला भाऊ, पत्नी, नातेवाईक किंवा आपल्या शब्दाबाहेर न जाणाऱ्याच्या गळ्यात सरपंचपदाची माळ टाकली. त्यामुळे वेळोवेळी डावललेले असे युवक आपल्याच पूर्वा श्रमीच्या नेत्यांच्या विरोधात दंड थोपटण्याचा तयारीत असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे आजपर्यंत गावात आपलेच राजकिय वर्चस्व असल्याचे सांगणाऱ्या नेत्यांचे धाबे दणाणले आहे. एकुणच ही निवडणूक अतिशय रंगतदार होणार असल्याच्या चर्चा आहे.
कसे आहे सरपंच पदाचे आरक्षण ?
सर्वसाधारण – शिंदोला, वरझडी, कायर
सर्वसाधारण महिला – कुरई, अहेरी, ब्राम्हणी
ना.मा.प्र.(महिला) – चारगाव, रांगणा, केसुर्ली, पुरड (नेरड)
ना.मा.प्र. (ओ.बी.सी.) – मेंढोली, वारगाव, साखरा (दरा), गणेशपूर, मंदर, कळमना (बु.)
अनुसूचित जाती – बोर्डा, वेळाबाई
अनुसूचित जमाती – चिखलगाव
निवडणूक कार्यक्रम:
नामनिर्देशन पत्र -15 ते 22 सप्टेंबर
अर्ज छाननी – 25 सप्टेंबर
नामांकन मागे घेणे – 27 सप्टेंबर दुपारी 3 वाजे पर्यंत
चिन्ह वाटप – 27 सप्टेंबर दुपारी 3 वाजे नंतर
मतदान – 7 ऑक्टोबर
मतमोजणी – 9 ऑक्टोबर