खासगी कोविड हॉस्पिटलच्या समर्थनासाठी शिवसेना सरसावली
विश्वास नांदेकर यांनी घेतली एसडीओंची भेट, हॉस्पिटल लवकर सुरू करण्याची मागणी
जब्बार चीनी, वणी: खासगी कोविड केअर सेंटरमध्ये आता माजी आमदार व शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांनी उडी घेतली आहे. खासगी कोविड हॉस्पिटलला समर्थन जाहीर करत त्यांनी कोविड सेंटर त्वरित सुरू करावे. तसेच हॉस्पिटलला सुरक्षा द्यावी अशी मागणी करत रविवारी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांची त्यांनी भेट घेतली. डेडिकेटेड कोविड सेंटरची परिसरातील नागरिकांना गरज असून स्थानिक नेते याला विरोध करीत आहे, जर प्रशासन सुरक्षा देत नसेल तर शिवसेना सुरक्षा देईल असे त्यांनी स्पष्ट केले.
तेली फैल येथील लोढा हॉस्पिटल याला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल करण्याचा जिल्हाधिकारी यांचा आदेश आहे. त्यानुसार हॉस्पिटलला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. शनिवारी स्थानिक नेते व स्थानिक रहिवाशी यांनी हॉस्पिटलला जाऊन तिथे सुरू असलेले काम थांबवले होते. त्यामुळे या प्रकरणात आता शिवसेनेने उडी घेऊन खासगी कोविड सेंटरला पाठिंबा दिला आहे. या संदर्भात त्यांनी उपविभागीय अधिका-यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल झाल्यास त्याचा परिसरातील नागरिकांना फायदा होणार आहे. गंभीर रुग्णांना उपचारासाठी यवतमाळ, नागपूर तसेच अदिलाबाद सारख्या ठिकाणी धाव घ्यावी लागणार नाही. सध्या या शहरातही रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे. जर शहरातच डेडिकेटेड कोविड ह़ॉस्पिटल झाल्यास रुग्णांना तातडीने सर्व सोयी सुविधा असलेली सेवा मिळेल. असे भूमिका त्यांनी स्पष्ट केली. जर प्रशासन सुरक्षा देण्यास असमर्थ असेल तर शिवसेना देईल असे ही त्यांनी सांगितले.
प्रशासन सुरक्षा देणार
खासगी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल हे शासनाच्या आदेशानुसार सुरू होत आहे. त्यामुळे त्या हॉस्पिटलला सर्व सुरक्षा पुरवली जाणार अशी ग्वाही उपविभागीय अधिकारी यांनी चर्चे दरम्यान दिल्याची माहिती विश्वास नांदेकर यांनी दिली. दरम्यान रविवारी कार्यालय बंद असूनही उपविभागीय अधिकारी यांनी वेळ देत चर्चा केली. सध्या डेडिकेटेड खासगी कोविड हॉस्पिटलचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. याला आता राजकीय वळण देखील आले आहे.
यावेळी रवि बोढेकर, विक्रांत चचडा, महेश चौधरी, अजय नागपुरे, नरेंद्र ताजणे, अजय चन्ने, प्रशांत बलकी, अनुप चटप, बंटी येरणे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)