वणी बहुगुणी बुलेटीन: 21 सप्टेंबर 2020

जाणून घ्या वणी, मारेगाव, झरी तालुक्यात दिवसभरात काय घडले?

0

आज दिवसभरात…. अर्थातच वणी बहुगुणी बुलेटीन…

आज 10 पॉजिटिव्ह, विठ्ठलवाडीत सर्वाधिक 3 रुग्ण
जब्बार चीनी, वणी: आज सोमवारी दिनांक 21 सप्टेंबर रोजी तालुक्यात 10 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये 7 व्यक्ती हे आरटी पीसीआर टेस्ट नुसार आले आहे. तर 3 व्यक्ती या रॅपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. शहरात विठ्ठलवाडी येथे सर्वाधिक 3 तर रंगारीपुरा, जनता शाळा परिसर, व इतर ठिकाणी प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. ग्रामीण भागात चिखलगाव, गणेशपूर, नायगाव, शिंदोला येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. आजच्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाची एकूण रुग्णांची संख्या 552 झाली आहे.

झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला शिक्षकाचा मृतदेह
नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील गोंडबुरांडा हद्दीत तलाव परिसरात झाडाला लटकलेला मृतदेह संशयास्पद परिस्थितीत सोमवारी आढळला. गोंडबुरांडा येथील जिल्हा परिषद शिक्षक राजकुमार संतोष बोंदरे (52) असे मृतकाचे नाव आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ही हत्या की आत्महत्या या चर्चेला परिसरात पेव फुटला आहे. मृतक राजकुमार संतोष बोंदरे हे पांढरकवडा पंचायत समिती अंतर्गत शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते पांढरकवडा येथे राहायचे ते रविवारपासून घरुन बेपत्ता होते. त्यांचा मोबाईलदेखील बंद होता, कुटुंबातील मंडळी रविवारपासून त्यांचा शोध घेत होते; पण त्यांचा शोध लागत नव्हता.

भाजी मार्केटमधून दुचाकी गेली चोरीला
विवेक तोटेवार, वणी: भाजी मार्केटमध्ये नगर परिषदेसमोर ठेवलेली दुचाकी चोरीला गेली. रविवारी 6 सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. याबाबत आज सोमवारी तक्रार देण्यात आली आहे. सचिन रामदास गायधने (33) असे दुचाकी मालकाचे नाव आहे. त्यांनी ही दुचाकी 2018 मध्ये खरेदी केली होती. सचिन हे शिवणी (साखरा) येथील रहिवासी आहे. ते 6 सप्टेंबर रोजी रविवारी वणीत भाजीपाला व काही सामान घेण्याकरिता आले होते. 4.30 वाजताच्या दरम्यान त्यांनी आपली दुचाकी (MH34 BM6128) नगर परिषद कार्यालयासमोर उभी केली. परंतु ते चावी काढायला विसरले होते.

मारेगाव तालुक्यात पुन्हा 5 पॉझिटिव्ह
नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आज पुन्हा 5 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. कानडा गावात कोरोनाने एन्ट्री केली आहे. आज मारेगाव, कानडा, रोहपट, पिसगाव या चार गावात रुग्ण आढळून आले आहे. तालुक्यात आता ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 22 झाली आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये मारेगाव येथे 1 पुरुष,रोहपट 1 महिला, कानडा 1 पुरुष येथे एक तर पिसगाव येथील 2 महिला पॉजिटिव्ह आढळून आल्या आहेत. तालुक्यात एकूण 51 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.

हजारो हेक्टरवरील कपाशीचे नुकसान, शेतकरी संकटात
संजय लेडांगे, मुकुटबन: मुकूटबन परिसरात शनिवारी व रविवारी रात्री अचानक वादळी वा-यासह पाऊस आला. सलग दोन दिवसांच्या पावसामुळे परिसरातील हजारो हेक्टर वरील कपाशीचे पीक जमिनदोस्त झाले आहे. तर सोयाबिन आणि तूर याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हाती आलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.

आशास्वयंमसेविका व गतप्रवर्क बेमुदत संपावर
विवेक पिदूरकर, शिरपूर: आज दिनांक 21 सप्टेंबर सोमवारी शिरपूर पीएससी अंतर्गत येणा-या आशासेविका व गतप्रवर्तक बेमुदत संपावर गेल्या आहेत. राष्टीय आरोग्य अभियान अंतर्गत कोवि़ड 19 च्या सर्वेक्षणाचे काम सध्या ते करीत आहे. मात्र त्यांना अत्यल्प मानधन देण्यात असल्याचा आरोप असून मानधनात वाढ करावी यासह विविध मागण्यांसाठी त्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. याबाबत शिरपूर पीएससीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण बोडखे यांना निवेदन देण्यात आले.

रेतीच्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी
सुशील ओझा, झरी: तालुक्यात खनिज विकास निधी अंतर्गत ग्रामपंचायत मार्फत जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडचे काम येदलापूर येथे सुरू करण्यात आले. १२ सप्टेंबर रोजी येदलापूर शाळेत ६ ब्रास अवैध रेतीसाठा केल्याची माहिती मिळताच पटवारीने रेती जप्त केली. पोलीस पाटील यांना सुपूर्तनाम्यावर दिली.

मुकुटबन येथे स्टेट बँकेचे ग्राहकसेवा केंद्र सुरू
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ मुकुटबन असून येथे भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यात आले. मुकुटबनसोबत परिसरातील ३० ते ४० गावाचे संपर्क येतो . या केंद्राचा लाभ या गावांना होईल. तालुक्यात ग्रामीण भागामध्ये भारतीय स्टेट बँकेची मुकुटबन येथेच शाखा आहे. त्यामुळे बँक ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते.

मारेगाव येथील “जनता कर्फ्यू” यशस्वी
नागेश रायपुरे, मारेगाव : तालुक्यात कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता, जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टिने कोरोनाची साखळी खंडित व्हावी या हेतूने चेंबर्स ऑफ कॉमर्स मारेगावच्या पुढाकारातून मारेगाव शहरात घेण्यात आलेला चार दिवसाचा “जनता कर्फ्यू” हा यशस्वी झाला. छोट्या-मोठ्या दुकानदारांनीसुद्धा या जनता कर्फ्फुला साथ दिली. परंतु देशी दारूच्या दुकानदारांनी साथ न देता जनता कर्फ्यू पाठ दाखवल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती.

खासगी कोविड हॉस्पिटलच्या समर्थनासाठी शिवसेना सरसावली
जब्बार चीनी, वणी: खासगी कोविड केअर सेंटरमध्ये आता माजी आमदार व शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांनी उडी घेतली आहे. खासगी कोविड हॉस्पिटलला समर्थन जाहीर करत त्यांनी कोविड सेंटर त्वरित सुरू करावे. तसेच हॉस्पिटलला सुरक्षा द्यावी अशी मागणी करत रविवारी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांची त्यांनी भेट घेतली. डेडिकेटेड कोविड सेंटरची परिसरातील नागरिकांना गरज असून स्थानिक नेते याला विरोध करीत आहे, जर प्रशासन सुरक्षा देत नसेल तर शिवसेना सुरक्षा देईल असे त्यांनी स्पष्ट केले.

कृषी शाखेचे विद्यार्थी घेत आहे कृषी व्यवसायाचे धडे
तालुका प्रतिनिधी, वणी: कोरोना संसर्गामुळे सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहे. परिणामी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास सुरू आहे. कृषी महाविद्यालयाचे चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम आणि शेतीवर आधारित व्यवसायांशी संलग्नता उपक्रम स्थानिक पातळीवर राबवित आहे. यामाध्यमातून कृषिचे विद्यार्थी कृषीवर आधारित व्यवसायाचे धडे गिरवित आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.