वणी बहुगुणी बुलेटीन: 22 सप्टेंबर 2020

जाणून घ्या वणी, मारेगाव, झरी तालुक्यात दिवसभरात काय घडले?

0

आज दिवसभरात…. अर्थातच वणी बहुगुणी बुलेटीन…

आज कोरोनाचे 12 रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 564
जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 22 सप्टेंबर रोजी तालुक्यात 12 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या 12 रुग्णांमधील सर्व रुग्ण हे शहरातील आहे. यात एकता नगर येथे सर्वाधिक 4 रुग्ण आढळून आले आहे. महाराष्ट्र बँक जवळ 3, सदाशिव नगर, ओम नगर येथे प्रत्येकी 2 तर रजा नगर येथे एक रुग्ण आढळून आला आहे. आजच्या रुग्णसंख्येमुळे तालुक्यातील कोरोनाची एकूण रुग्णांची संख्या 564 झाली आहे.

कोरोनाच्या रुग्णाचा कोविड सेंटरमध्ये जाण्यास नकार…
नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यताील पिसगाव येथे कोरोना रुग्णावरून चांगलेच नाट्य रंगले. रुग्णांने चक्क कोविड केअर सेंटरमध्ये जाण्यास नकार दिल्याने प्रशासन चांगलेच गोत्यात आले. रुग्णाला उपचारासाठी नेण्यावरून प्रशासन व गावकरी आमनेसामने आले. यावरून दोन दिवस पिसगावमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन दिवस हा हाय व्होल्टेज ड्रामा रंगला. अखेर प्रशासन आणि गावक-यांनी यावर मध्यममार्ग काढल्याने या नाट्यावर आज पडदा पडला.

नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांवर गुन्हा दाखल करा
सुशील ओझा, झरी: येथील नगरपंचायतीच्या कारभाराला त्रस्त होऊन गावकऱ्यांनी विविध मागण्या घेऊन उपोषण सुरू केले होते. त्यावेळेस आपल्या सर्व मागण्या मान्य करण्याचे खोटे आश्वासन देऊन उपोषण मागे घ्यायला लावले. आजपर्यंत त्यातील एकाही मागणीची पूर्तता केली नाही. ती फसवणूक असल्याचा आरोप करीत उपोषणकर्यांनी पाटण पोलीस स्टेशनला तक्रार दिली. नगरपंचायतीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचीदेखील मागणी केली आहे.

डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला सुरक्षा पुरवा
पुरुषोत्तम नवघरे, वणी: तेली फैल येथे सुरू होणा-या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला स्थानिक रहिवाशांनी विरोध केला आहे. मात्र शहरातील वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या लक्षात घेऊन हे हॉस्टिटल लवकरात लवकर सुरू करावे व हॉस्पिटलला तात्काळ सुरक्षा पुरवावी ही मागणी घेऊन दिनांक 21 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निवेदन देण्यात आले.

वाघोबा आला रे आला, म्हणताहेत पवनारवाले
संजय लेडांगे, मुकुटबन: वनपरिक्षेत्रातील पवनार (बंदी) वनवर्तुळालगत असलेल्या शेतशिवारात पट्टेदार वाघाचा मुक्तसंचार वाढल्याचे गावकरी म्हणत आहेत. शेतीकाम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांना अधून-मधून पट्टेदार वाघाचे दर्शन होत आहेत. परिणामी ते पट्टेदार वाघाच्या दहशतीत वावरत आपल्या शेतातील शेती कामे जीव मुठीत घेऊन करीत आहेत.दरम्यान परिसरात भीतीचे वातावरण आहेत. त्यामुळे ‘वाघोबा आला रे आला’ असं म्हणण्याची वेळ गावकऱ्यांवर कधीही येऊ शकते.

मेंढोली, बोरगावचा वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
विवेक पिदूरकर, शिरपूर: मेंढोली आणि बोरगाव या दोन्ही गावातील घरगुती वीज पुरवठा अनेक दिवसांपासून खंडित होत असतो. खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्वरित वीज पुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिरपूर वीज वितरण कार्यालय प्रमुखांना निवेदनाद्वारे दिला आहे.

अर्धवट राहिलेल्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करा
सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: आपल्या आयुष्यात डिग्री मिळवण्याची संधी काही कारणांमुळ हुकली असेल. ते स्वप्न पूर्ण करण्याची संधी आता चालून आली आहे. आपले आधीचे शिक्षण काही कारणांनी थांबले असले, तरीही हे स्वप्न आता पूर्ण करू शकता. विठ्ठलवाडीतील अहमद ले आऊट येथे न. प. शाळा क्रमांक 7 जवळ एन.बी.एस.ए. महाविद्यालय आहे. येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र आहे. इथे पूर्वतयारी, बी. ए. आणि बी. कॉमसाठीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.

शिक्षक संजय पुनवटकर यांचे नागपुरात निधन
तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील शिंदोला येथील आदर्श विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक संजय पुरुषोत्तम पुनवटकर (52) यांचे दि. 21 सोमवारला सायंकाळी अल्पशा आजाराने नागपूरला निधन झाले. त्यांचे मुळगाव वनोजादेवी होते. प्रकृती अस्वस्थ असल्याने त्याना 16 तारखेला नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तिथेच उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. नागपूर येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झालेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.