नागेश रायपुरे, मारेगाव: मुळचे तालुक्यातील मांगरुळ या गावातील व वणी येथील रहिवाशी असलेले सौरभ कुमार आंबटकर यांनी क्रिकेटच्या दुनियेत उंच भरारी घेतली आहे. सध्या दुबई येथे सुरू असलेल्या आयपीएलमध्ये त्यांची कोलकाता नाईट रायडर (केकेआर) या टीमचा असिस्टंट बॉलिंग कोच म्हणून त्यांची निवड झाली आहे. सध्या सौरभ यांचे फोटो सोशल मीडियात चांगलेच व्हायरल होत असून त्यांच्यावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सौरभचे प्राथमिक शिक्षण वणी येथे झाले. लेफ्ट आर्म स्पिन बॉलिंग करणा-या सौरभने शालेय क्रिकेटपासूनच आपली छाप सोडली. त्यानंतर तो पुढील शिक्षणासाठी नागपूर येथे गेला. दरम्यान त्याने मुंबई येथे जगप्रसिद्ध क्रिकेट कोच स्व. रमाकांत आचरेकर यांच्याकडे क्रिकेटचे धडे गिरवले. दरम्यान त्याची अंडर 14 च्या महाराष्ट्र संघात निवड झाली. त्यानंतर अंडर 16 व इंडर 19 तो मुंबई संघा कडून खेळला. त्यानंतर त्याने विदर्भाच्या टीमचे प्रतिनिधित्व करत विदर्भाकडून अनेक रणजी सामने खेळलेत. वणीतील झालेल्या अनेक तुर्नामेंटमध्येही सौरभने सहभाग घेतला होता. सध्या तो मुंबई येथे एका क्रिकेट अकाडमीत प्रशिक्षण म्हणून काम करतोय.
नुकतेच 19 सप्टेंबर पासून दुबई येथे सुरू झालेल्या आयपीयलच्या केकेआर या टीमचा असिस्टंट बॉलिंग कोच म्हणून तो कार्यरत आहे. मांगरूळ, वणी सारख्या आपल्या भागातील एक तरुण आयपीएल क्रिकेट टीमचा भाग झाल्याने सध्या सौरभची परिसरात चांगलीच चर्चा होत आहे. सौरभचे आयपीएलमधले फोटो सोशल मीडियात व्हायरल होत असून त्याच्यावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
परिसरातील लोकांच्या सपोर्टमुळे शक्य – स्वप्निल आंबटकर
काही दिवसांआधीच वडिलांचे निधन झाले असल्याने आम्ही यातून सावरलेलो नाही. अशातच आयपीएलसारखी संधी आल्याने ही जबाबदारी पार पाडणे अवघड होते. मात्र स्वत:ला सावरत केवळ इच्छाशक्ती, प्रोत्साहन यामुळे सौरभ आपले बेस्ट देण्याचा प्रयत्न करतोय. हे केवळ परिसरातील लोकांचे सहकार्य, प्रेम आणि प्रोत्साहनामुळे शक्य होत आहे.
– स्वप्निल आंबटकर, सौरभ यांचे मोठे बंधू
मूळचे मांगरुळ येथील रहिवासी असलेले सौरभचे वडील दिवंगत डॉ. कुमार विठ्ठलराव आंबटकर यांचे वैद्यकीय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी 1977 साली वणी येथे वैद्यकीय सेवा सुरू केली. तेव्हापासून ते वणीत स्थायिक झाले. नुकतेच डॉ. कुमार आंबटकर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने 14 सप्टेंबर रोजी निधन झाले होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)