सुशील ओझा, झरी: अस्मानी आणि सुलतानी संकटांनी शेती व्यवसाय सध्या तोट्यात आहे. तरीही नवीन पिढी जिद्दीने आणि उमेदीने शेतीकडे अधिक जोमाने वळत आहे. हे चित्र अत्यंत आशादायी आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि सुयोग्य नियोजन याचा अवलंब केल्यास ही माती, देईल यश हाती. मातीमाय त्याचा खिसा रिकामा ठेवणार नाही. असे मत शेती मित्र डॉ. दिलीप अलोणे यांनी व्यक्त केले. ते समृद्ध बळीराजा अभियान अंतर्गत मार्की येथील प्रगत शेतकरी विनोद उलमाले यांच्या शेतावरील शिवारभेटीत शेतकऱ्यांना संबोधित करत होते.
विनोद उलमाले यांच्या शेतातील कापूस आणि सोयाबीन पिकांची पाहणी डॉ. अलोणे यांनी केली. त्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले. सोबतच भरघोस उत्पादनाची आशा व्यक्त केली. यावेळी परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. रासायनिक खत व कीटकनाशकांचा अवास्तव वापर न करता नियोजन आणि निगा केल्यास पीक यशस्वी होतात. ही भावना विनोद उलेमाले यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांचे पीक पाहण्यासाठी शेतकरी दूरवरून इथे येतात. त्यामुळे त्यांचा उत्साह अधिक वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या संकटकाळात परिस्थितीमुळे तरुणवर्ग बेरोजगार झालेला आहे. तो आपल्या गावाकडे परतत आहे. शेतीत रमायला लागला आहे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन ही तरुणाई परिश्रम घेत आहे. ही वाटचाल निश्चितच बळीराजाला समृद्ध करणारी आहे. तसे विचार प्रा. डॉ. अलोणे यांनी व्यक्त केलेत.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या शंकानिरसन केल्यात. याप्रसंगी प्रवीण नोमुलवार, श्रीकांत वल्लभकर, जगदीश येनगुवार, दादाजी उलमाले आणि शेतकरी उपस्थित होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)