‘गावक-यांचा विरोध असतानाही दारुच्या दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र’
परवानगी देऊ नये यासाठी 170 लोकांनी लिहिले प्रशासनास पत्र
जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील कायर येथे बाबापूर-पिंपरी रोडला लागून होणा-या नवीन देशी दारू व बियरबार बाबत कायरवासी आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी स्थानिक लोकांचा विरोध असतानाही ग्रामपंचायतीने दुकानाला परवानगी दिल्याचा आरोप करत दुकानाला दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करावे, अशी मागणी गावक-यांनी केली आहे. याबाबत गावातील दिडशेपेक्षा अधिक लोकांनी प्रशासनास पत्र पाठवले आहे. जर दुकानाची परवानगी रद्द केली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही गावक-यांनी दिला आहे.
कायर येथे पूर्वी दोन देशी दारूचे दुकान व दोन बियरबार होते. दरम्यान ज्या गावाची लोकसंख्या 3 हजार आहे अशा गावातील दारूची दुकानं बंद करावीत असा शासनाने आदेश काढला होता. त्यानुसार तेथील सर्व दुकाने बंद करण्यात आली. आता गावापासून 200 ते 250 मीटरच्या अंतरावर बाबापूर पिंपरी रोडला लागून देशी दारू दुकानाचे व बिअरबारचे स्थानांतरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र नवीन ठिकाणी सुरू होणा-या दुकानास गावक-यांनी विरोध दर्शवला आहे.
ग्रामपंचायतीची गुपचुप कार्यवाही?
कायर या गावाची लोकसंख्या तीन हजारांपेक्षा कमी असतानाही ग्रामपंचायतीने दारुच्या दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र दिले. ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत कोणतीही माहिती किंवा दवंडी गावात देण्यात आली नाही. याशिवाय आमसभा किंवा ग्रामसभा घेऊन याबद्दल ठराव घेण्यात आलेला नाही. असे गावक-यांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायतीने गावक-यांना अंधारात ठेऊन असा गुपचुप निर्णय घेण्यामागे काही ‘अर्थ’पूर्ण व्यवहार तर नाही? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.
बाबापुर पिंपरी हा रस्ता रहदारीचा आहे. येथूनच रेल्वे बायपासचा मुख्य रस्ता जातो. शालेय विद्यार्थी, महिला, शेतकरी यासाठी हा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे यांना त्याचा त्रास होऊ शकतो. शिवाय याच मार्गावर अवघ्या 100 मीटर अंतरावर मंदिर असल्याने भाविकांनाही याचा त्रास होऊ शकतो. दारूच्या दुकानामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाली आहेत. भावी पिढी यांचे भविष्य भविष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. असेही प्रशासनला पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.
ग्रामपंचायतीने सर्व नियम धाब्यावर बसवून गावाजवळ दारूचे दुकान सुरू करण्याचा चंग बांधला आहे. हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असून ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डची तपासणी करावी व देशी दारू व बियरबारला परवानगी देऊ नये अशी मागणी करत गावक-यांनी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ, पालकमंत्री संजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय यवतमाळ, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील व विभागीय आयुक्त अमरावती यांना सुमारे 170 महिला व पुरुषांनी टपाल द्वारे अर्ज दिले आहे.
सदर प्रकरणाची योग्य चौकशी न झाल्यास ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा गावक-यांनी दिला आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)