डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी
मारेगाव येथे तहसिलदारांना निवेदन सादर
नागेश रायपुरे, मारेगाव: वणीत तेली फैल येथे सुरू होणारे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी आज शुक्रवारी दिनांक 25 सप्टेंबर रोजी मारेगाव येथे जिल्हाधिकारी यांना तहसिलदारांमार्फत निवेदन देण्यात आले. शहरातील वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या लक्षात घेऊन हे हॉस्टिटल लवकरात लवकर सुरू करणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात म्हटले आहे की शहरातील कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज रुग्णांची संख्या 600 च्या वर पोहोचली आहे. मारेगाव येथेही मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे. तालुक्यात सुसज्ज व सर्व सेवा सुविधा असेलेले कोविड हॉस्पिटल नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. परिणामी रुग्णांना यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, अदिलाबाद इत्यादी ठिकाणी उपचारासाठी जावे लागत आहे. मात्र तिथे देखील बेड उपलब्ध नाहीत त्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.
वणीत त्वरित डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरू झाले तर नागरिकांना स्थानिक ठिकाणीच उपचार मिळेल व बाहेर गावी जाऊन उपचार घ्यावा लागणार नाही. मारेगाव आणि झरीतील गंभीर रुग्णांनाही याचा फायदा होईल. कोविड रुग्णांना वेळीच उपचार मिळाला नाही तर जीवही गमवावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देते वेळी अंकुश माफूर, मुन्नाभाई पठाण, दयाल रोगे, नितीन गोडे, भास्कर राऊत, पवन नक्षिणे, सौरव ठावरी, बंडू गोटे, नत्थुजी पुरके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)