“विदर्भाचा मेवा, गेला कुणाला देवा’
विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला नागपूर कराराचा निषेध व होळी
जब्बार चीनी, वणी: “विदर्भाचा मेवा, गेला कुणाला देवा’ जणू काही असंच म्हणत होते आंदोलनकर्ते. विदर्भावर होत असलेल्या आरोपांचा पाढा वाचत सोमवारी 28 सप्टेंबर 2020 ला नागपूर कराराचा निषेध झाला. तसेच होळीही झाली. विदर्भभर जिल्हा स्तरावर,तालुका स्तरावर व गाव स्तरावर या कराराचा होळी करून निषेध करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून वणी येथील टिळक चौक येथे करण्यात आला.
28 सप्टेंबर 1953 रोजी नागपूर करार करून पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी विदर्भाला जबरदस्तीने महाराष्ट्रात सामील करून घेतले. 1 मे 1960 साली विदर्भासह महाराष्ट्र राज्याचे निर्माण केले. विदर्भाच्या जनतेला न सांगता,जनतेशी चर्चा न करता नागपूर करारावर पश्चिम महाराष्ट्र विदर्भाच्या नेत्यांनी सह्या केल्या. पश्चिम महाराष्ट्राच्या फायद्यासाठी विदर्भाला नागपूर करार अंतर्गत महाराष्ट्रात शोषणासाठी सामील करून घेतले. असे आंदोलकांचे म्हणणे आहे.
नागपूर कराराप्रमाणे विदर्भाला तर महाराष्ट्रात सामील करून घेतले. करारातील 11 कलमपैकी एकही कलम पाळले नाही. नंतर विदर्भाच्या वाट्याला शोषणाशिवाय काहीच मिळाले नाही. यासाठी महाराष्ट्रातील व विदर्भातील ज्याने त्या करारावर सह्या केल्यात ते सर्वस्वी दोषी आहेत. कलम न पाळल्यामुळे तो करार तसाही भंग झालेला आहे. असा आरोप करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला.
नागपूर कराराप्रमाणे महाराष्ट्र राज्यात तयार होणाऱ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये विदर्भाच्या जनसंख्येच्या प्रमाणात 23% नोकऱ्या विदर्भाच्या तरुणांना देऊन उच्चपदाच्याही नोकऱ्या 23% देऊ म्हटले; परंतु दिल्यात फक्त 6.8% . तर उच्च पदाच्या नौकऱ्या दिल्यात 2.26%. जवळपास चार लाख नोकऱ्या विदर्भाच्या तरुणांच्या पळविल्यात. उच्चपदाच्या सर्व मोठ्या नोकऱ्यासुद्धा त्यांनीच लाटल्यात म्हणून विदर्भात बेरोजगारीची फौज उभी राहली. असं समितीनं म्हटलं.
राज्याच्या तिजोरीत 23% निधी विदर्भाच्या विकासाला देणार म्हटले; परंतु दिला नाही. 75 हजार कोटी सिंचनाचे व 50 हजार कोटी रुपये रस्त्याचे विदर्भाच्या हक्काचे पळविले. म्हणून गोसेखुर्दसारखे व इतर 131 धरणे 30 वर्षांनंतरही पूर्ण होऊ शकली नाहीत. वीज विदर्भाची; परंतु तिही पळविली. विदर्भाला लोडशेडिंग या पळवापळवीमध्ये विदर्भ गरिब, कर्जबाजारी व बेरोजगार झाला, म्हणून या नागपूर कराराचा निषेध व होळी करण्यात आल्याचं म्हटलं आहे.
यावेळी प्रा. पुरुषोत्तम पाटील, रफिक रंगरेज, देवराव धांडे, राहुल खारकर, दशरथ,पाटील, सूरज महातळे, संजय चिंचोळकर, राजू पिंपळकर, रुद्रा कुचनकर, मंगेश रासेकर, प्रा.बाळासाहेब राजूरकर, सृजन गौरकर,आकाश सूर, अमित उपाध्ये, राहुल झट्टे, राहुल खिरटकर, विकेश पानघाटे, दिलीप भोयर, मिलिंद पाटील, धीरज भोयर, सचिन पिंपळकर, शरद खोंड, मंगेश डोंगे,अनिल गोवारदीपे, दीपक नरवडे, विनोदकुमार आदे यांसह अनेक विदर्भवादी उपस्थित होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)