सिमेंट रोड बांधकामात विद्युत खांब व झाडांचा अडथळा
नगर परिषद, वन विभाग व महावितरण कडून मंजुरीची प्रतीक्षा
जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील मुकुटबन टी पॉईंट ते साई मंदिर चौक या मुख्य मार्गावर रस्ता रुंदीकरणसह सिमेंट रोड बांधकाम सुरू आहे. या कामामध्ये 15 मीटर रस्त्याची रुंदी करताना रस्त्याच्या मध्यभागी एक मीटर रुंदीच्या दुभाजकाचे बांधकाम केले जाणार आहे. रस्त्याच्या बाजूला फुटपाथ व त्यानंतर ड्रेनेज बांधण्यात येणार आहे. मात्र रस्त्याच्या कडेला उभे असलेले मोठे मोठे झाडे, विद्युत खांब ब डीपीचे शिफ्टिंग न झाल्यामुळे सदर काम मागील चार महिन्यापासून रखडला आहे.
रस्त्याच्या मध्ये येणारे झाडे तोडणे व विद्युत खांब शिफ्टिंग करणे करिता संबंधित कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार सूचना केल्या. मात्र तीन महिन्यापासून बांधकाम उपअभियंता यांनी कंत्राटदाराच्या सुचनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे काँक्रेटीकरणचे काम थांबविण्यात आल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत वणी, कायर ते पुरड राज्यमार्ग क्र. 319 मध्ये 23 किमी रस्त्याचे रुंदीकरणसह सुधारणा करण्याचे काम वर्ष 2018 मध्ये मंजूर करण्यात आले होते. तब्बल 48 कोटीच्या कामाचे कंत्राट पुणे येथील मे. आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमी. या कंपनीला देण्यात आले. सदर काम प्रत्यक्ष सुरू करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता सा. बा. विभाग पांढरकवडा यांनी ऑगस्ट 2019 मध्ये काढले.
सदर कामात रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण, लहान पूल तसेच 1400 मीटर सिमेंट रस्त्याचे कामे करावयाचे आहे. याचा एक भाग म्हणून मुकुटबन रोड टी पॉईंट ते साई मंदिर चौकापर्यंत 600 मीटर सिमेंट काँक्रीट रस्ता होणार आहे.
संबंधित कंत्राटदारांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दीड मीटर खोदकाम करून बोल्डर, मुरूम, गिट्टी टाकून दबाई केली आहे. परंतु सहाशे मीटरच्या लांबीत तब्बल 38 लिंबाचे झाड व 25 ते 30 विद्युत पोल रस्त्याच्या मधात उभे आहे. झाडे व विद्युत खांब हटविण्यासाठी कंत्राटदारांनी बांधकाम विभागाशी पत्र व्यवहार केले. परन्तु बांधकाम विभागाने रस्त्यावरील झाडे, विद्युत खांब व डीपी शिफ्टिंगसाठी संबंधित विभागाशी संपर्कच केले नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
बांधकाम विभाग अधिकाऱ्यांच्या कामचुकार धोरणामुळे वणी शहरातील नागरिकांना चांगल्या रस्त्यापासून वंचित रहावं लागत आहे. रस्ता बांधकामात अडथळा ठरणारे झाडे व वीज खांब लवकरात लवकर काढण्यात यावे अशी मागणी होत आहे.
मंजुरी न मिळाल्याने काम रखडले: परळीकर
साई मंदिर ते मुकुटबन रोड टी पॉईंट पर्यंत रस्त्याच्या बाजूला असलेले मोठे झाड व विद्युत पोल काढण्याकरिता नगर परिषद, वन विभाग व वीज वितरण कंपनीला पत्र दिले आहे. नगर परिषद व वन विभागाकडून मंजुरीची प्रतीक्षा आहे. वीज वितरण कंपनी कडून शिफ्टिंग खर्च चा इस्टीमेट मिळाला नाही. संबंधित मंजुरी मिळताच झाडे कापून रस्ता बनविण्यात येईल.
:तुषार परळीकर: उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वणी