विवेक तोटेवार, वणी: लासलगाव येथे मुख्य शाखेमध्ये अनेक ठेवीदारांचे पैसे परत मिळत नसल्याने लोकांनी बँकेत तोडफोड केली. बँक संचालकास अटक करण्यात आली. बँकेमध्ये नौकरी देण्याचे अमिष दाखवून अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकाकडून पैसे घेऊन त्यांना बँकेत रुजू करून घेतले. त्यांच्याच खात्यातील पैसे त्यांना मिळत नसल्याने अनेकांची दिशाभूल व फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे. अगोदर फक्त कर्मचाऱ्यांचे पैसे मिळत नव्हते परंतु आता तर बँकेमध्ये ठेवी ठेवणाऱ्या ग्राहकांनाही पैसे मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांबरोबर ग्राहकांमध्येही रोष निर्माण होत आहे.
त्यातच वणीतील खाती चौकामध्ये स्थित असलेल्या बँकेत कुणीही कर्मचारी नसल्याने ग्राहकांच्या मनात फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे. बँकेतील मॅनेजरला मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद असल्याचे समजले. अनेक ग्राहकांना फसवणूक झाल्याचं वाटत आहे. आता विश्वास तरी कुणावर ठेवावा अशी अवस्था निर्माण झाली आहे.
बँकेमध्ये रोज 100 रुपये 200 रुपये जमा करणाऱ्या ग्राहकांनाही बँक बंद झाल्याचे समजताच त्यांनीही बँकेत गर्दी केली. बँकेमध्ये पैसे मिळण्यासाठी ग्राहकांच्या रांगा पहावयास मिळत आहे. याबाबत बँक मॅनेजर अजय नरड याना विचारणा केली असता त्यांनी सर्व ग्राहकांना त्यांचे पैसे परत मिळणार परंतु यासाठी 15 ते 20 दिवसाचा वेळ लागणार असल्याचे सांगितले. त्यांचे स्वतचेही पैसे बँकेत आहे तेव्हा ग्राहकांना त्यांचे मेहनतीचे पैसे आम्ही मिळवून देऊ अशी हमी त्यांनी यावेळी दिली. जर ग्राहकांना पैसे मिळाले नाही तर पोलिसातही याबाबत तक्रार देण्यात येईल अशी धमकी अनेक ग्राहक देत आहे.