नागेश रायपुरे, मारेगाव : मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीद्वारे झालेल्या ऑनलाईन “राज्यस्तरीय गुणिजन्य गौरव महासंमेलन 2020” या सांस्कृतिक उपक्रमात वणी येथील रहिवासी व मारेगाव येथील कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक सुपरिचित हास्यकलाकार हेमंत उत्तमराव चौधरी यांना “राज्यस्तरीय कलारत्न गौरव पुरस्कार 2020” मिळाला. यामुळे यांचे परिसरात कौतुक होत आहे.
प्रा. हेमंत चौधरी हे कला वाणिज्य महाविद्यालय मारेगाव येथे जेष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. संपूर्ण विदर्भात ते एक हास्यकलाकार व नटसम्राट म्हणून प्रसिद्ध आहेत. दरवर्षी हाेत असलेल्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत वणी येथील नाट्यांत प्रमुख भूमिकेसह सहभागी होतात. वणी आणि मारेगाव येथे रंगपंचमी निमीत्ताने दरवर्षी होत असलेल्या महामुर्ख संमेलनात प्रेक्षकांचे अक्षरशः हसून हसून पोट दुखवत भरपूर मनाेरंजन करतात.
तसेच यापुर्वी वणी, मारेगावसह विदर्भात अनेक ठिकाणी झालेल्या विविध कार्यक्रमात हसतखेळत त्यांनी ज्वलंत समस्यांवर प्रबोधन केले आहे. त्यांच्या विविध कार्यक्रमांत न हसणारी व्यक्तीदेखील खळखळून हसतात हे त्यांच्या वाणीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. 2020 चा राज्यस्तरीय कलारत्न गौरव पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)